Homeठाणे-मेट्रोठाण्यातील अपघातात पोलीस हवालदारासह महिलेचा मृत्यू ; डंपरची दुचाकीला धडक,वर्तकनगर येथील घटना

ठाण्यातील अपघातात पोलीस हवालदारासह महिलेचा मृत्यू ; डंपरची दुचाकीला धडक,वर्तकनगर येथील घटना

ठाणे:- नवीन घेतलेल्या घराचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी दुचाकीवरून चाललेले ठाणे शहर पोलीस दलातील ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट पाचचे पोलीस हवालदार सुनील रावते (४५, रा. सावरकरनगर, ठाणे) आणि त्यांना निबंधक कार्यालयात घराची नोंदणी करण्यासाठी सहाय्य करणाऱ्या मिमा रामपूरकर (४०, रा. विटावा, ठाणे) या दोघांचा भरधाव वेगाने आलेल्या डंपरने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास वर्तकनगर परिसरात घडली. अपघातानंतर डंपर चालक पसार झाला असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांनी दिली.
गेल्या काही वर्षांपासून ठाण्यातील सावरकरनगर भागात रावते हे वास्तव्याला आहेत. त्यांनी वसंतविहार परिसरात नविन घर खरेदी केले होते. त्याच घराच्या रजिस्ट्रेशनसाठी ते सकाळी घरातून सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास बाहेर पडले. निबंधक कार्यालयात घराची नोंदणी करण्याचे सहाय्य करणाऱ्या मिमा रामपूरकर या महिलेसह ते त्यांच्या मोटारसायकलीवरुन वर्तकनगरच्या दिशेने जात असताना आलेल्या भरधाव आलेल्या डंपरने त्यांच्या दुचाकीला कोरस टॉवरजवळ धडक दिली. या अपघातामध्ये रावते आणि त्यांच्या सोबत असलेली महिला दोघेही गंभीर जखमी झाले. या दोघांनाही तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, या दोघांचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी डंपर चालकाविरुद्ध वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रावते 2014 साली झाले होते पोलीस दलात भरती…


रावते यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. ते ठाणे शहर पोलिस दलात २०१४ मध्ये  पोलिस कॉन्स्टेबल म्हणून भरती झालेले होते. सध्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट पाचमध्ये कार्यरत होते. यापूर्वी ते पोलिस मुख्यालय, नौपाडा विभागाचे सहायक आयुक्त कार्यालयात नेमणूकीला होते.

कर्तव्यनिष्ठ कर्मचाऱ्याला मुकल्याची भावना …..
गुन्हे अन्वेषण विभागात कार्यरत असलेल्या रावते यांनी गुन्हे उघड करण्यात मोलाची कामगिरी बजावली होती. त्यांच्या निधनामुळे एका चांगल्या, कर्तव्यनिष्ठ कर्मचाऱ्याला मुकल्याची भावना वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास घोडके आणि सहायक पोलिस निरीक्षक अविनाश महाजन यांनी व्यक्त केली.

error: Content is protected !!