आगीच्या घटनेत फ्रीजसह दोन मीटर बॉक्स जळून खाक
ठाणे: गेल्या काही तासात ठाणे शहरातील वेगवेगळ्या भागात चार आगीच्या घटना समोर आल्या आहेत. यामध्ये एका हॉटेल्सच्या चिमणीसह बर्गर शॉप आणि सोसायटी मीटर बॉक्स रूमचा समावेश असून या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र वित्तहानी झाली असून यामध्ये फ्रीज आणि दोन मीटर बॉक्स सह चार इलेक्ट्रिक स्विच बोर्ड व इलेक्ट्रिक वायरिंग जळुन खाक झाल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.
रविवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास हिरानंदानी मेडोज परिसरातील पहिल्या मजल्यावरील शॉप नं. १०१- १०२ मधील रिव्येरा बार अँड रेस्टॉरंट या हॉटेलच्या किचनमधील चिमणीला आग लागली होती. ही आग साडे नऊ वाजण्याच्या सुमारास नियंत्रणात आणण्यात यश आले. यावेळी मोठया प्रमाणात धूर झाला असला तरी कोणालाही काही ही त्रास झाला नव्हता. तसेच दुसरी आगीच्या घटना, वसंत विहार या ठिकाणी इमारत क्रमांक ०८ च्या तळ मजल्यावरती असलेल्या मीटर बॉक्सच्या केबलला किरकोळ आग लागली होती. ही घटना सोमवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास समोर आली होती. तर तिसरी आगीच्या घटना सोमवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास खारटन रोड परिसरातील मॅक्स या बर्गरच्या शॉपला आग लागली होती. या घटनेत शॉप मधील ०२ फ्रीज व इलेक्ट्रिक वायरिंग पूर्णपणे जळून खाक झाली. तर चौथी आगीची घटना सोमवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास राबोडी नंबर १ मधील मिलन या इमारतीच्या तळ मजल्यावरती असलेल्या मीटर रूममधील केबलला व मीटरला आग लागली.वया आगीमध्ये मीटर रूम मधील दोन मीटर, चार इलेक्ट्रिक स्विच बोर्ड व इलेक्ट्रिक वायरिंग जळाले आहे. या आगीच्या घटनांची माहिती मिळताच त्या त्या घटनास्थळी ठामपा अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने धाव घेत, आगीवर वेळी नियंत्रण मिळविले. तर राबोडीतील घटनेत स्थानिक नागरिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.
…….






