ठाणे:- मंगळवारी ठाण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. गोकुळनगर,श्रीरंग सोसायटी, आझाद नगर आणि वृंदावन सोसायटी परिसरात या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले असून, श्रीरंग विद्यालयाची मोठी संरक्षक भिंत कोसळली आहे.
या मुसळधार पावसामुळे अनेक रहिवाशांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे घरातील मौल्यवान वस्तू, फर्निचर आणि विद्युत उपकरणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच, रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांमध्येही पाणी गेल्याने त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.
या नैसर्गिक आपत्तीमध्ये श्रीरंग विद्यालयाचेही मोठे नुकसान झाले. नाल्याच्या पाण्याच्या प्रवाहामुळे शाळेची सुमारे २०० मीटर लांबीची संरक्षक भिंत कोसळली. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य आणि इतर वस्तूंचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच भाजपचे माजी नगरसेवक कृष्णा पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी बाधित नागरिकांना धीर दिला आणि नुकसानीची माहिती घेतली. प्रशासनाकडून तातडीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी नागरिकांना दिले.