Homeठाणे-मेट्रोठाण्यात मोठा अंमली साठा जप्त ; दोन कोटी ६० लाखांहून अधिकच मुद्देमाल...

ठाण्यात मोठा अंमली साठा जप्त ; दोन कोटी ६० लाखांहून अधिकच मुद्देमाल जप्त

तीन कारवाईत सात जण जेरबंद ; ठाणे अंमली
विरोधी पथकाची कामगिरी

ठाणे: –ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एम डी आणि गांजा या अंमली पदार्थाची सर्रास विक्री होत असल्याची बाब पोलीस कारवाईने पुन्हा एकदा समोर आली आहे. अंमली पदार्थांची विक्रीसाठी आलेल्या सात जणांना ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकाने वेगवेगळ्या तीन कारवाईमध्ये जेरबंद केले आहे. तर त्यांच्याकडून १ हजार १३७.२ ग्रॅम एम. डी. आणि ४४ किलो ८५५ ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ असा एकुण २ कोटी ६० लाख ०३ हजार १०० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात यश आले आहे. पाच जणांना येत्या १७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस तर दोघांना न्यायालयीन कोठडी मिळाली असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमर सिंह जाधव यांनी शुक्रवारी ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान अंमली पदार्थाबाबत कोणाला माहिती मिळाल्यास त्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला द्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे. याशिवाय याबाबत माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात अंमली पदार्थ विक्री संदर्भात विशेष मोहीम राबवुन कडक कारवाई करावी असे आदेश पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिले होते. त्यानुसार ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के यांनी विशेष मोहिम हाती घेत, मिळालेल्या माहितीनुसार १२ फेब्रुवारी रोजी शीळ डायघर, ठाकूर पाडा येथे केलेल्या कारवाईत १ हजार १०९.१ ग्रॅम वजनाचा मॅफेड्रॉन (एम. डी.) या अंमली पदार्थ जप्त करत, राजस्थान येथील इलियास कुशहाल खान (१९), अमान कमाल खान (२१) आणि शीळ डायघर येथील सैफअली असाबउल हक खान (२५) या तिघांना अटक करून त्यांच्याकडून २ कोटी २५ लाख ४५ हजार ५०० रुपये किमतीचा मु‌द्देमाल जप्त केले. याप्रकरणी शिळ डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हयात अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराज्यीय कनेक्शन तपासामध्ये समोर आलेले आहे. तसेच अंमली पदार्थ बाहेरील राज्यात बनविला जातो व त्यानंतर त्याची विक्री महाराष्ट्र राज्यात विक्रीकरीता आणला जातो. तर अटकेतील त्रिकुटाने महाराष्ट्र तसेच इतर राज्यात देखील अंमली पदार्थाची विक्री केल्याची प्राथमिक माहिती तपासामध्ये समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अंबरनाथ मध्ये पकडला गांजा
अंबरनाथ, नेवाळी नाका येथे ११ फेब्रुवारी रोजी टाकलेल्या छाप्यात ४४ किलो ८५५ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करून परभणीतील मंगल उत्तम पवार (२५) आणि नेवाळीमधील अमर सुभाष पवार (३६) या दुकलीला अटक केली. तसेच त्यांच्याकडून जप्त केलेल्या गांजा किंमत २२ लाख ८५ हजार १०० रूपये असल्याची पोलिसांनी दिली. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
उल्हासनगरात ५८.१ ग्रॅम एम डी जप्त
उल्हासनगर , साईबाबा मंदिर चौकात १० फेब्रुवारी रोजी केलेल्या कारवाईत पोलिसांनी ५८.१ ग्रॅम वजनाचा मॅफेड्रॉन (एम. डी.) जप्त करून उल्हासनगर मधील आरीफ मोहमद शरीफ खान, (२१) आणि सफीकुर रेहमान सिराज अहमद खान ( २२) या दोघांना अटक केली. तसेच कारवाईत जप्त केलेल्या एमडी ची किमंत ११ लाख ७२ हजार ५०० रुपये इतकी असून याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या तिन्ही कारवाईमध्ये जप्त केलेला अंमली पदार्थाचे उत्पादन, विक्री, वाहतुक, साठवणुक यामध्ये कोण कोण सहभागी आहे ? याचा तपास ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथक करत आहेत.
ही कारवाई ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के, सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, जगदीश गावित, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र निकम, नितीन भोसले, दिपेश किणी, मोहन परब, पोलीस हवालदार अमोल देसाई, प्रशांत राणे, संदीप भांगरे, हेमंत महाले, महेश साबळे, हुसेन तडवी, हरीष तावडे, अभिजीत मोरे, शिवाजी वासरवाड, विक्रांत पालांडे, पोलीस नाईक अनुप राक्षे, हवालदार शिल्पा कसबे, पोलीस शिपाई कोमल लादे यांनी केली आहे.

error: Content is protected !!