ठाणे: मीरा रोड येथून ठाण्यात मॅफेड्रॉन (एम.डी) अंमली पदार्थ विक्री करीता असलेल्या मोईन मोहम्मद आरिफ निर्बाण ( २९ ) आणि मोहम्मद मुझमिल लियाकतअली नागोरी (२७) या दुकलीला अटक करून त्यांच्याकडून १५२.५ ग्रॅम वजनाचा मॅफेड्रॉन (एम.डी) हा अंमली पदार्थ हस्तगत करण्यात यश आले आहे. त्या मुद्देमालाची किंमत सुमारे २५ लाख रुपये इतकी असल्याची माहिती ठाणे शहर पोलीस जनसंपर्क अधिकारी तथा वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांनी दिली.
मानपाडा, हॅपी व्हॅली सर्कल जवळ एक दुकली एमडी हे अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची ठाणे शहर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार अमोल देसाई यांना मिळाली होती. त्यानुसार मानपाडा येथे सापळा रचून त्या दोघांना अटक केली. तसेच त्यांच्याकडून १५२.५ ग्रॅम वजनाचा मॅफेड्रॉन (एम.डी) हा अंमली पदार्थ हस्तगत केला आहे. याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या दुकलीने जप्त करण्यात आलेले मॅफेड्रॉन (एम.डी) हा अंमली पदार्थ कोठुन आणला ? या व्यतिरीक्त आणखी साठा आहे का? याबाबत अधिक तपास सुरू आहे.
ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के, सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, जगदीश गावित, पोलीस उपनिरीक्षक दिपेश किणी, नितीन भोसले, राजेंद्र निकम, पोलीस हवालदार हरिश तावडे, अमोल देसाई, अभिजित मोरे, प्रशांत राणे, हुसेन तडवी, हेमंत महाले, महेश साबळे, शिवाजी वासरवाड , शिल्पा कसबे, पोलीस नाईक अनुप राक्षे, पोलीस शिपाई कोमल लादे यांनी केली आहे.