ठाणे : ठाणे महापालिकेच्या वतीने ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी गणशोत्सव आरास स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत सार्वजनिक मंडळांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रशासक तथा महापालिका आयुक्त डॉ विपिन शर्मा यांनी केले आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रातील अनंत चतुर्दशीपर्यंत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणारी मंडळे या आरास स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. आरास स्पर्धेसाठी देखाव्यात कलात्मकतेबरोबर उद्देशही विचारात घेतला जाईल. कोणत्या धर्माविषयी असहिष्णू वृत्ती प्रकट करणा-या देखाव्यांचा पारितोषिकासाठी विचार केला जाणार नाही. आरास स्पर्धेबरोबर उत्कृष्ट मुर्ती आणि स्वच्छता या साठी पारितोषिके देण्यात येतील.
स्पर्धेतील विजेत्या सार्वजनिक मंडळाना पहिले पारितोषिक रु. १०,०००/-, दुसरे पारितोषिक रु.७,५००/- व तिसरे पारितोषिक रु ६,५००/- अशी एकूण आठ बक्षिसे, स्मृतीचिन्हे आणि प्रशस्तीपत्रक देण्यात येईल.
सार्वजनिक गणेशोत्सव आरास स्पर्धे मधील सहभागी मंडळांना निर्धारीत केलेल्या अटी व शर्ती लागू राहतील. या स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणा-या संस्थांना तसेच गणेशोत्सव मंडळांना अर्जाचे नमुने, माहिती व जनसंपर्क विभाग, महापालिका भवन, पहिला मजला, पाचपाखाडी, ठाणे (पश्चिम) येथे १ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ११.०० ते १.३० व दुपारी २.३० ते ५.०० या वेळेत मिळतील.,अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख २ सप्टेंबर २०२२ अशी असून ह्या मुदतीनंतर आलेले अर्ज स्विकारले जाणार नाही.






