[ ■ सुहास खंडागळे/ सडेतोड ]
पावसाळा आला की तुंबलेले नाले येथील नेत्यांनी,समाजसेवकांनी जेसीबी लावून साफ करायचे….पावसात गटारे तुंबली तर ती जनतेने साफ करायची…रस्त्यावर फेरीवाले बसले…लोकांना चालायला जागा उपलब्ध नसली की फेरीवाल्यांना दिवा मनसेने हटवायचे आणि रस्ते मोकळे करायचे?…हे सगळं जर दिव्यातील जनतेनेच करायचे आहे तर आयुक्त साहेब तुमच्या पालिकेचे पगारी अधिकारी आणि कर्मचारी करतात काय?हा आमचा प्रश्न आहे.
सर्वसामान्य दिवेकरांचा रविवार हा पाण्यात जातो…तसा रविवार हा सार्वजनिक सुट्टीचा वार असला तरी दिव्यासाठी तो सार्वजनिक पाणी लाईन दुरुस्ती दिवस आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
येथील नागरिक स्वतःच्या इमारतीला होणाऱ्या पाणीपुरवठा लाईन स्वतः चेक करतात.दूरवरून पाणी लाईन आणल्या असतील तर त्या स्वतः चेक करण्यासाठी सुट्टीचा वार खर्च करतात….ठाण्याप्रमाणे दिव्यातील जनता देखील पालिकेचे सुविधा कर भरते…या भरलेल्या कराच्या बदल्यात कोणत्या सुविधा उपलब्ध होतात?
पूर्वी दिव्यात पक्के रस्ते नव्हेत. कच्चे रस्ते होते.तेव्हाचे कच्चे रस्ते किमान मोकळे होते.लोकांना चिखलातून चालावं लागत होतं मात्र चालायला मिळत होत. गाड्या चिखलात उभ्या राहत होत्या मात्र संध्याकाळच्या वेळेला पार्किंग मिळत होत…आता पक्के रस्ते झाले… गल्लीबोळात सिमेंट काँक्रीटचे रस्ते झाले आणि लोकांना त्या रस्त्यावरून चालणे अवघड झाले. संध्याकाळी अख्या दिवा शहराचा जणू बाजार भरलेला असतो…अशा वेळी प्रश्न पडतो…हा रस्ते विकास नेमका कुणासाठी झाला?
आयुक्त साहेब,दिव्याकडे आताच लक्ष द्या…अन्यथा हे शहर बकाल होईल.नंतर उपाययोजना करणे अवघड जाईल.
ठाण्यासाठी विकासाची वेगळी मोजमापे आणि दिव्याला वेगळा न्याय असं करून चालणार नाही.फार मोठी लोकसंख्या दिव्यात वास्तव्यास आहे.या वाढलेल्या लोकसंख्येला सुविधा देणे हे पालक संस्था म्हणून महापालिकेचे काम आहे. कर्तव्य आहे!
जे अधिकारी, कर्मचारी हे कर्तव्य पार पाडण्यात अपयशी ठरत आहेत असे लोकं पालिकेचे प्रमुख म्हणून आपण परत बोलवायला हवेत. आयुक्त म्हणून आपण दिव्यात नागरी सुविधा उपलब्ध होत आहेत की नाही याकडे लक्ष द्यायला हवे… स्मार्ट होऊ पाहणाऱ्या ठाणे शहाराप्रमाणे दिव्यातील जनतेला सुद्धा त्याच विकासाची अपेक्षा आहे…आपण त्याकडे गांभीर्याने पाहणार का?हा प्रश्न आहे.