ठाण्यातील कबड्डी स्पर्धेला मान्यवरांची भेट
ठाणे :- ठाण्यात सुरू असलेल्या मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धेत चौथा दिवस थरारक सामने, खेळाडूंच्या जबरदस्त चढाया आणि झुंजार पकडींनी गाजला. अखेरच्या मिनिटांत पारडे फिरविणाऱ्या खेळी पाहून प्रेक्षकांनी कबड्डीचा खऱ्या अर्थाने अनुभवला. काही लढतींमध्ये अवघ्या एका गुणाने निसटता पराभव पत्करावा लागल्याची चुटपुट खेळाडूंना लागली. चौथ्या दिवशी रंगलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढती पाहण्यासाठी ठाणेकरांनी गर्दी केली होती.
भाजपा ठाणे शहर जिल्हा व विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संजय वाघुले आणि शारदा संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी नगरसेवक कृष्णा पाटील यांनी ठाणे शहर कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने राज्य अजिंक्यपद निवड चाचणी मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा भरविली आहे. या स्पर्धेच्या चौथ्या दिवशी प्रेक्षकांची खच्चून गर्दी केली होती.
७२ व्या पुरुषांसाठीच्या श्री कृष्ण करंडक व महिलांसाठीच्या स्व. पार्वतीबाई सांडव चषक राज्य अजिंक्यपद स्पर्धेमुळे ठाण्यातील क्रीडा वर्तुळातील वातावरण कबड्डीमय झाले आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यातील अव्वल कबड्डी खेळाडूंच्या लढती पाहण्यासाठी प्रेक्षकांबरोबरच राजकीय नेत्यांमध्येही उत्सूकता होती. काल माजी केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील, खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, माजी खासदार आनंद परांजपे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, माजी महापौर अशोक वैती, भाजपाचे महापालिकेतील माजी गटनेते मनोहर डुंबरे, माजी ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे, उमेश पाटील, सुधीर कोकाटे, सिद्धार्थ ओवळेकर यांच्यासह सनदी अधिकाऱ्यांनीही स्पर्धेला भेट देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. या पदाधिकाऱ्यांनी खेळाडूंबरोबर संवादही साधला. तसेच काही वेळ चूरशीच्या लढतीचा आनंद घेतला.