ठाणे: – ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या नेतृत्वाखाली ता. कल्याण येथील दहागांव आणि गोवेली (ता. कल्याण) गावांमध्ये विविध विकास योजनांची व कामांची सविस्तर पाहणी करण्यात आली.
या दौऱ्यात प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, गट विकास अधिकारी संजय भोये, सहाय्यक गट विकास अधिकारी (पं. स. कल्याण) रघुनाथ गवारी, विस्तार अधिकारी श्री. पराग भोसले, ग्रामविकास अधिकारी जी.आर. कुटेमाटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. पुनम जयकर, तसेच इतर संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आरोग्य सेवा व घरकुल योजनेची पाहणी
दहागांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन वैद्यकीय सेवा, रुग्ण नोंदणी प्रक्रिया, औषध साठा व उपलब्ध मनुष्यबळ याचा आढावा घेण्यात आला. घरकुल योजनेंतर्गत लाभार्थ्यांच्या घरी जाऊन घरकुलांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
या वेळी ग्रामपंचायत माजी सरपंच अरविंद मिरकुटे यांनी स्थानिक पातळीवरील समस्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. त्यावर तात्काळ कार्यवाहीसाठी संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या.
ग्रामपंचायत जागेची पाहणी व कामाच्या सूचना
दहागांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीसाठी ग्रामपंचायतीच्या जागेची पाहणी करून तेथे जागे संदर्भांत पुढील दोन दिवसांत आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी, अशा स्पष्ट सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी दिल्या.
गोवेली येथील उपविभागीय पाणी तपासणी प्रयोगशाळेला भेट
यानंतर गोवेली येथील उपविभागीय पाणी तपासणी प्रयोगशाळेला भेट देण्यात आली. प्रयोगशाळेतील कामकाजाची पाहणी करण्यात आली तसेच कामकाज वेळेत पुर्ण करण्यासाठी सुचना दिल्या.