Homeशहर परिसरदिवा:कुत्रा चावल्यानंतर उपचार सुरू असतानाच ५ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा नातेवाईकांचा...

दिवा:कुत्रा चावल्यानंतर उपचार सुरू असतानाच ५ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा नातेवाईकांचा आरोप

दिवा: दिवा शहरातील बेडेकर नगर दिवा- आगासन रोड परिसरात दुर्दैवी घटना घडली आहे.पिसाळलेला कुत्रा चावल्यामुळे ५ वर्षीय चिमुरडीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. निशा शिंदे असे या मृत बालिकेचे नाव असून, या प्रकरणात महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांच्या कामावर नातेवाईकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या घटनेमुळे शिवसेना ठाकरे गटाचे स्थानिक नेते व सामाजिक कार्यकर्ते श्री.उतेकर यांनी संताप व्यक्त केला आहे.

नेमकी घटना काय?
उतेकर यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, १७ नोव्हेंबर रोजी रात्री १०:३० ते ११:०० च्या सुमारास निशा आपल्या घराबाहेर खेळत असताना एका पिसाळलेल्या कुत्र्याने तिच्या खांद्याचा लचका तोडला. पालकांनी तिला तातडीने डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले. पहिल्याच दिवशी तिला चार इंजेक्शन्स देण्यात आली होती.त्यानंतर तिथे तिच्यावर पुढील महिनाभर उपचार सुरू होते.

वाढदिवसानंतर तब्येत खालावली:
उपचार सुरू असताना ३ डिसेंबरला निशाचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला, तेव्हा तिची प्रकृती स्थिर असल्याचे जाणवत होते. मात्र, १६ डिसेंबर रोजी उपचाराचा शेवटचा टप्पा आणि चौथे इंजेक्शन दिल्यानंतर तिची प्रकृती अचानक बिघडली. तिच्यामध्ये रेबीजची लक्षणे दिसू लागल्याचे डॉक्टरांनी सांगितले. असे उतेकर म्हणाले.

प्रशासकीय निष्काळजीपणाचा आरोप?
निशाची प्रकृती चिंताजनक झाल्याने तिला मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तिथे पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी ती वाचण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले.

स्थानिक नेते आणि नातेवाईकांनी उपस्थित केलेले प्रश्न:

जर १७ नोव्हेंबरपासून १६ डिसेंबरपर्यंत सर्व इंजेक्शन्स आणि उपचार वेळेवर दिले जात होते, तर महिनाभरानंतर तिच्यात रेबीजची लक्षणे कशी काय दिसली?
शास्त्रीनगर रुग्णालयात तिला देण्यात आलेली औषधे आणि इंजेक्शन्स योग्य दर्जाची होती का?
डॉक्टरांनी उपचारात काही चूक केली का? असे सवाल शिवसेना ठाकरे गटाचे स्थानिक नेते व सामाजिक कार्यकर्ते श्री.उतेकर यांनी उपस्थित केले आहेत.
या घटनेमुळे दिवा परिसरात संतापाची लाट पसरली आहे. एका हसत्या-खेळत्या चिमुरडीचा अशा प्रकारे अंत झाल्याने हळहळ व्यक्त केली जात असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

” दिवा शहरात भटक्या कुत्र्यांचा गंभीर प्रश्न आहे.मात्र प्रशासन याकडे लक्ष देताना दिसत नाही.एका लहान चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला आहे. दिवा शहरात रुग्णालय व्हावं यासाठी आम्ही लढत आहोत. आज येथील सर्वसामान्य जनता रुग्णालय नसल्याने हैराण आहे. जर योग्य उपचार झाले असते तर या चिमुकलीचा जीव वाचला असता.”

– सौ ज्योती राजकांत पाटील , दिवा शहर महिला संघटिका, ठाकरे गट

error: Content is protected !!