Homeठाणे-मेट्रोदिव्यात डेंग्यु आणि मलेरियाच्या रुग्णांत वाढ

दिव्यात डेंग्यु आणि मलेरियाच्या रुग्णांत वाढ

ठाणे :- ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात मलेरिया आणि डेंग्यू या तापाच्या आजारामध्ये अक्षरशः चढाओढ पाहण्यास मिळत आहे. जुलै महिन्यात डेंग्यूचे सर्वाधिक १२७ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापाठोपाठ मलेरिया १२३, चिकणगुणिया २९ आणि टायफाईडचे २७ चे रुग्ण आढळून आले आहेत. शहराचा विचार केल्यास दिवा शहर हा डेंग्यू आणि मलेरिया या तापाने फणफणताना दिसत आहे. दिव्यात ४५ रुग्ण हे डेंग्यू आणि १८ रुग्ण मलेरियाचे आहेत.
पावसाळा सुरु झाला आणि विविध ठिकाणी पाणी साचून डासांची उत्पत्ती सुरु झाली आहे. यामुळे पावसाळ्याच्या कालावधीत मलेरिया आणि डेंग्यु रुग्ण संख्येत वाढ होते. या आजारांनी डोके वर काढू नये म्हणून आरोग्य यंत्रणांकडून काळजी घेण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून निर्माणधीन इमारती, पंक्चर टायर दुरुस्ती दुकाने, गॅरेज, अशा सर्वांना पालिकेकडून नोटीसा बजावण्यात येतात आणि त्यात पावसाचे पाणी साठणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येते. अशाचप्रकारे ठाणे महापालिकेने यंदाही काळजी घेण्याचे आवाहन केले असले तरी, शहरात डेंग्यु आणि मलेरिया रुग्ण संख्येत वाढ होताना दिसून येत आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात मे महिन्यात डेंग्यूचे १५ रुग्ण तर, मलेरियाचे १६ रुग्ण आढळून आले होते. परंतू, जून महिन्यात या रुग्ण संख्येत वाढ झाल्याचे दिसत आहे. १ जून ते २६ जून या कालावधीत महापालिका क्षेत्रात डेंग्यूचे ६५ तर, मलेरियाचे ५५ रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली. त्यानंतर जुलै महिन्यात पुन्हा हा आकडा वाढतांना दिसून आला आहे. एकट्या जुलै महिन्यात ठाण्यात मलेरियाचे १२३, डेंग्युचे १२७, टायफाईडचे २७ आणि चिकणगुणियाचे २९ रुग्ण आढळून आले आहेत. त्यातही टायफाईडचे सर्वाधिक ११ रुग्ण हे दिवा प्रभाग समितीत आढळून आले आहेत. तर चिकणगुनियाचे १४ रुग्ण हे माजिवडा मानपाडा प्रभाग समितीत आढळून आले आहेत. मलेरियाचे सर्वाधिक २९ रुग्ण नौपाडा – कोपरी प्रभाग समिती आणि डेंग्युचे सर्वाधिक म्हणजेच ४५ रुग्ण हे दिवा प्रभाग समितीत आढळून आले आहेत.
प्रभाग समिती – मलेरिया – डेंग्यु – टायफाईड – चिकणगुनिया
दिवा – १८ – ४५ – ११ – ०२
कळवा – ०९ – २० – ०२ – ००
लोकमान्य सावरकर नगर – २२ – २० – ०० – ००
माजिवडा मानपाडा – १७ – २३ – ०५ – १४
मुंब्रा – ०७ – १४ – ०५ – ०१
नौपाडा- कोपरी – २९ – ०१ – ०० – ०४
उथळसर – ०९ – ०२ – ०० – ०२
वर्तकनगर – ०६ – ०७ – ०१ – ०४
वागळे इस्टेट – ०६ – ०१ – ०३ – ०२
—————————————————–
आरोग्य विभागाकडून नागरिकांना आवाहन
पाणी साठवणाऱ्या टाक्या झाकून ठेवणे, आठवड्यातून एकदा साठवलेले पाणी पूर्णपणे रिकामे करावे, प्लास्टिक, बाटल्या, टायर यांचा योग्य निपटारा करणे, गटार, नाल्यांची नियमित सफाई, पूर्ण बाह्यांचे कपडे वापरणे, विशेषत: सकाळ-संध्याकाळच्या वेळेत, डास प्रतिबंधक क्रीम, लोशन वापरणे, डास जास्त असलेल्या भागात जाणे टाळावे, ताप, सर्दी झाल्यास तत्काळ नजीकच्या आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करावी असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!