Homeशहर परिसरदिवा पश्चिमेतील महापालिका शाळेत १८ महिन्यांपासून पाणीटंचाई; १,४०० विद्यार्थ्यांचे हाल

दिवा पश्चिमेतील महापालिका शाळेत १८ महिन्यांपासून पाणीटंचाई; १,४०० विद्यार्थ्यांचे हाल

शाळा क्रमांक ९८/७९ मधील पाणीप्रश्नावर आमदार संजय केळकर यांची संबंधित प्रशासनाला तातडीच्या कार्यवाहीची सूचना

दिवा : दिवा पश्चिम येथील ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक ९८/७९ मध्ये पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली असून, एप्रिल २०२५ पासून शाळेतील पिण्याचे पाणी बंद असल्याचे समोर आले आहे. शाळेत सुमारे १,४०० विद्यार्थी शिक्षण घेत असून, त्यांना पिण्यासाठी तसेच दैनंदिन वापरासाठी पाणी उपलब्ध होत नसल्याने मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या गंभीर समस्येची दखल घेत भाजपचे ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी संबंधित प्रशासनाला तातडीने कार्यवाही करण्याची सूचना केली आहे.

शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची मूलभूत जबाबदारी आहे. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून पाणीपुरवठा बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वीही शाळेला पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला होता. तरीदेखील समस्या कायम असल्याने पालकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

या प्रश्नासंदर्भात आमदार संजय केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना शाळेतील पाणीटंचाईकडे गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक कार्यवाही करण्याची सूचना केली आहे. शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी आणि दैनंदिन वापरासाठी आवश्यक पाणी उपलब्ध होईल, यासाठी योग्य व्यवस्था करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे.

शाळेत सुमारे १,४०० विद्यार्थी शिक्षण घेत असताना पाण्यासारख्या मूलभूत सुविधेचा प्रश्न इतका काळ प्रलंबित राहणे ही गंभीर बाब आहे. आमदारांच्या सूचनेनंतर ठाणे महापालिका प्रशासन या समस्येवर तातडीने तोडगा काढून शाळेतील पाणीपुरवठा सुरळीत करणार का, याकडे आता पालकांचे लक्ष लागले आहे. आशा भोरे यांनी याबाबतचे निवेदन दिले होते.

दिवा भाजपच्या वतीने विजय भोईर, सतीश केळशीकर यांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे हा विषय मांडला. तसेच विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.

error: Content is protected !!