दिवा:-दिवा पोलीस चौकी मध्ये कायमस्वरूपी महिला पोलीस अधिकारी नियुक्त करावा जेणेकरून येथील महिला वर्गाला त्यांच्या तक्रारी व अडचणी दिव्यातच नोंदवता येतील, असे सांगत भाजपच्या सपना भगत यांनी दिवा पोलीस चौकीत कायमस्वरूपी महिला पोलीस अधिकारी नेमण्याची मागणी केली आहे.
सौ.सपना भगत म्हणाल्या की,दिवा शहरात महिलांवर होणाऱ्या अन्यायाचे प्रमाण वाढले आहे. असे असताना देखील दिवा पोलिस चौकी मध्ये एकही महिला पोलिस अधिकारी नाही. तीन दिवसा पूर्वी एका महिलेवर रात्रीच्या वेळी अत्याचार झाल्याची घटना घडली असता सदर महिला रात्री १.३० वाजता पोलिस चौकीत गुन्हा दाखल करण्यास आली असता महिला पोलिस अधिकारी नसल्या कारणाने तिला मुंब्रा पोलिस स्टेशनला जायला सांगितले असे सपना भगत म्हणाल्या. रात्रीच्या वेळी महिलेने मुंब्रा पोलिस चौकीला जाणं महिलेच्या सुरक्षेच्या दृष्टीने जोखमीचे आहे. असे सपना भगत यांनी म्हटले आहे. या प्रकरणाची दखल घेत सपना भगत यांनी दिवा शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न चिन्ह निर्माण केल आहे. या पूर्वी ही सौ.सपना भगत यांनी महिला पोलिस अधिकाऱ्याची मागणी केली होती.त्यावेळी त्यांच्या मागणीची दखल घेत महिला पोलिस अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली होती. पण काही तांत्रिक कारणास्तव त्यांना मुंब्रा पोलिस चौकीला पाठवण्यात आले.
दिवा शहरातील महिलांवर होणाऱ्या अन्यायाच्या घटनांचा वाढता आलेख बघता दिवा पोलिस चौकी मध्ये महिला पोलिस अधिकाऱ्यांची तात्काळ पण कायमस्वरूपी नियुक्ती करावी अशी मागणी भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ सपना रोशन भगत व त्यांचे सहकारी मनीषा शालबिद्रे, साक्षी गावणकर,साधना सिंग, प्रियांका माडभगत, विठ्ठल गावडे यांनी केली आहे.






