Homeठाणे-मेट्रोदिवा बदलतोय, दिव्याला आधुनिक पायाभूत सुविधांचे केंद्र बनवणार - डॉ. श्रीकांत शिंदे

दिवा बदलतोय, दिव्याला आधुनिक पायाभूत सुविधांचे केंद्र बनवणार – डॉ. श्रीकांत शिंदे

दिवा : “दिवा शहराचा चेहरामोहरा झपाट्याने बदलत आहे. गेल्या ७-८ वर्षांत आम्ही रस्ते, पाणी यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर काम केले. मात्र, आता दिवा केवळ मूलभूत सुविधांपुरता मर्यादित न राहता, आधुनिक पायाभूत सुविधांचे केंद्र बनणार आहे,” असे प्रतिपादन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले. ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘शिवसेना-भाजप-आर.पी.आय. (आठवले)-रिपब्लिकन सेना’ महायुतीच्या दिव्यातील अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.
सभेला संबोधित करताना डॉ. शिंदे यांनी दिव्यातील आगामी प्रकल्पांची माहिती दिली.
मेट्रो कनेक्टिव्हिटी: कल्याण फाट्यावरून शिळफाटा मार्गे मुंब्रा आणि पुढे ठाण्यापर्यंत मेट्रो नेण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव असल्याचे त्यांनी सांगितले.
बुलेट ट्रेन स्टेशन: म्हातार्डी येथे बुलेट ट्रेनचे स्टेशन साकारत असून, त्याला दिवा रेल्वे स्थानकाशी जोडले जाईल, ज्यामुळे दिव्याचे महत्त्व जागतिक नकाशावर येईल.
पायाभूत सुविधा: १० एकर क्षेत्रात ‘क्लस्टर डेव्हलपमेंट’ योजनेद्वारे समूह विकास केला जात आहे. तसेच ठाणे शहरात एकाच वेळी १३ क्लस्टरचे काम सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
वाहतूक कोंडीतून मुक्ती: कल्याण फाटा येथे डबल डेकर एलिव्हेटेड रोड आणि अंडरपासचे काम सुरू असून यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल.
आरोग्य आणि सामाजिक बांधिलकी:
डॉ. शिंदे यांनी महायुती सरकारने केलेल्या आरोग्य कामांचा पाढा वाचला. डोंबिवली आणि उल्हासनगर येथे प्रत्येकी २०० बेडचे कॅन्सर रुग्णालय मोफत उपचार देत आहे. तसेच कळवा येथील रुग्णालयात कार्डिओलॉजी आणि युरोलॉजी सेंटर सुरू करण्यात आले आहे, जिथे हृदय आणि किडनीचे उपचार पूर्णपणे मोफत होत आहेत.

“इतर पक्षाचे लोक केवळ टीका करतात, मात्र आम्ही ९५% कामे पूर्ण करून पुन्हा लोकांसमोर आलो आहोत,” असे सांगत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. दिव्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.
“येत्या १५ तारखेला महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्या, जेणेकरून विकासाचा हा ‘बुलेट’ वेग कायम राहील,” असे आवाहन डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी केले. या सभेला महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि दिवा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!