Homeसंपादकीयदिवा मनसेच्या आमरण उपोषणाने प्रभाग समिती अधिकाऱ्यांच्या पाणीपुरवठा धोरणाचे बिंग फोडलय.. आता...

दिवा मनसेच्या आमरण उपोषणाने प्रभाग समिती अधिकाऱ्यांच्या पाणीपुरवठा धोरणाचे बिंग फोडलय.. आता तरी प्रशासन भानावर येईल काय ?

सुहास खंडागळे/दिवा न्यूज विशेष

मनसेचे प्रकाश पाटील दिव्यातील पाणी प्रश्न सुटावा यासाठी आमरण उपोषणाला बसले आहेत.दिवा शहरात पाण्याच्या नावाखाली चाललेला गोरख धंदा, पाण्याच्या नावाने नागरिकांची लूट, आणि मस्तवाल पाणीपुरवठा अधिकाऱ्यांचा माज या विरोधात मनसेचे प्रकाश पाटील यांचे आंदोलन असल्याचे मनसेचे शहराध्यक्ष तुषार पाटील सांगतात.

काही गंभीर प्रश्न
दिव्यात पाणी प्रश्न आहे का ? तर याचे उत्तर हो असे आहे. दिव्यातील जनतेला महागड्या दराने पाणी विकत घ्यावे लागते का ? तर याचे उत्तर देखील हो असेच आहे. दिव्यातील सर्वसामान्य नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा करण्यास ठाणे महापालिका अपयशी ठरली का ? तर या प्रश्नाचे उत्तर देखील हो आहे. दिव्यातील नागरिक जे टँकर पोटी महिन्याला तीन ते चार हजार खर्च करतात ते महापालिकेचे पाणी बिल भरणार नाहीत का? तर याचे उत्तर नागरिक पाणी बिल भरायला तयार आहेत असंच आहे…मग दिवा शहरात ठाणे महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग नेमकं करतो काय ? हा मूलभूत प्रश्न मनसेचे प्रकाश पाटील यांच्या आंदोलनात निमित्ताने निर्माण झाला आहे.

ठाणे महापालिकेचे प्रशासन याचा विचार करणार आहे की नाही?

हा प्रश्न आहे.तुम्ही ग्रामीण भागामध्ये नागरिकांना वर्षाचे 365 दिवस प्रति मानसी, प्रतिदिवशी 55 लिटर पाणी देण्यासाठी जलजीवन मिशन नावाच्या योजना करोड रुपये खर्च करून राबवल्या. मग मुंबईजवळ असणाऱ्या ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा शहरात दर दिवशी प्रतिमानशी प्रति दिवशी 55 लिटर मुबलक पाणी तरी महापालिके मार्फत नागरिकांना मिळतंय का ? याचं आत्मपरीक्षण कोण करणार. महापालिका क्षेत्रात प्रतिमानसी, प्रतिदिवशी पाणी देण्याचे प्रमाण हे 55 लिटर पेक्षा अधिक आहे. मात्र तसा प्रकार दिवा शहरात होताना दिसत नाही. जे नियम ठाणे, कळवा शहराला लागू आहेत ते नियम ठाणे महानगरपालिका दिवा शहरात राबवताना दिसत नाही. मनसेने जे आक्षेप या आंदोलनादरम्यान पाणीपुरवठा विभागावर घेतले आहेत ते वस्तुस्थिती दर्शवणारे आहेत. महापालिका प्रशासन नागरिकांना इमारती मागे अधिकृत नळ कनेक्शन देते. मात्र या दिलेल्या अधिकृत नळ कनेक्शनला पाणी नसते आणि ज्या खाजगी एजंट मार्फत इमारतींना महागड्या दराने पाणीपुरवठा होतो त्या खाजगी एजंटच्या पाईपलाईनला पाणी कुठून येतं?याचे उत्तर महापालिकेचे अधिकाऱ्यांनी द्यायला हवं. दिव्यातील नागरिकांना दुहेरी भुर्दंड सोसावा लागतो. पाणी न येणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या पाईपलांचे बिल देखील भरावे लागते आणि खाजगी एजंट कडून विकत घेणाऱ्या पाण्याच्या पाईपलाईनचे देखील पैसे द्यावे लागतात.

जर खाजगी यंत्रणा दिवा शहरांमध्ये प्रत्येक इमारती मागे दहा हजार, पाच हजार रुपये घेऊन पाणीपुरवठा करू शकत असेल तर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला अशी कोणती धाड भरली आहे की त्यांच्या नळ कनेक्शनला पाणी येत नाही ?

याचा खोलवर जाऊन अभ्यास करायचा म्हटला आणि मनसेचे आरोप खरे आहेत असं म्हटलं तर ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिव्यातील पाणी वितरण व्यवस्था ही खाजगी लोकांना भाडेतत्त्वावर चालवायला दिली आहे का ? असा प्रश्न या निमित्ताने पडतो.खरंतर मुख्य जलवाहिनी पासून अंतर्गत जलवाहिन्या आणि नागरिकांच्या इमारतींपर्यंत पाईपलाईन टाकण्याची जबाबदारी ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची आहे. महापालिकेने खरंतर प्रत्येक सोसायटीला मुबलक प्रमाणात पाणी मिळेल याची व्यवस्था करून दिली तर नागरिक टँकरने पाणी घेणार नाहीत.नागरिक खाजगी लोकांकडून चोरीचे पाणी विकत घेणार नाहीत. नागरिकांची गरज पाणी ही आहे.ते देण्यात महापालिका प्रशासन अपयशी ठरते त्यामुळे याचं खापर नागरिकांवर फोडून चालणार नाही.महापालिका पालक म्हणून दिवा शहरातील नागरिकांना पाणी देण्यात अपयशी ठरल्याचं हे उदाहरण आहे.

मनसेच आंदोलन हे त्यासाठीच असल्याचं प्रकाश पाटील यांच्याशी बोलल्यानंतर जाणवतं. प्रकाश पाटील यांचे म्हणणं असं आहे, जर तुम्ही टँकर लॉबीला पाणीपुरवठा करू शकता… टँकर लॉबी दिव्यातील गोरगरीब जनतेला विकत पाणीपुरवठा करते.खाजगी एजंट महिन्याला दहा हजार, पाच हजार, सहा हजार घेऊन चोरीच्या लाईन द्वारे पाणी विकतात… तर मग ठाणे महानगरपालिका थेट नागरिकांना पाणी कनेक्शन का देत नाही हा प्रकाश पाटील यांचा प्रश्न चुकीचा नाही.

महापालिका आयुक्तांनी या प्रकरणात गंभीर लक्ष घालायला हवं. दिव्यातील पाणी वितरण व्यवस्था तपासायला हवी. दिव्यातील पाणी वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या इमारतीपर्यंत पाणीपुरवठा का केला जात नाही,याचा जाब आयुक्तांनी स्थानिक पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना विचारायला हवा. जी पाणीपुरवठाची अनागोंदी चालू आहे, त्या अनागोंदीच्या विरोधात पावलं उचलायला हवीत. करोड रुपये दिव्यातील पाणी वितरण व्यवस्थेवर खर्च होतात आणि तरीही दिव्यातील जनतेला टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागत असेल, खाजगी एजंट कडून पाण्याच्या लाईन घ्याव्या लागत असतील तर हे ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अपयश आहे.

असा प्रकार ठाण्यातील अन्य भागात सापडतो का याचा विचार पालिका आयुक्तानी करायला हवा. तुम्ही खरंतर दिव्यातील पाणी व्यवस्थेच ऑडिट करायला हवं .लोकं पाणी पट्टी भरण्यासाठी तयार आहेत. तरी तुम्ही त्यांना पाणी देत नाहीत ही लोकांची चूक नाही तर ही प्रशासनाची घाणेरडी मानसिकता दाखवणारी गोष्ट आहे.

तसं पाहायला गेलं तर दिव्यातील जनतेला गृहीत धरण्याचा जो प्रकार प्रशासनाकडून होतो त्याचच उदाहरण या पाणी समस्येत दिसतं.मुळात येथील नागरिक पाणी समस्येपासून कायमचे मुक्त झाले पाहिजेत असे प्रशासनाला वाटत नाही. तसं वाटलं असतं तर पाणी प्रश्नावर तोडगा काढला गेला असता .पाणी वितरण व्यवस्था न सुधारण्यामागे खाजगी एजंट बरोबर असणारे पाणीपुरवठा विभागाचे साटलोट हे तर कारण नाही ना ? याचा तपास आता पालिका आयुक्तांनी करायला हवा. पालिका आयुक्त यांनी या संदर्भात लक्ष घालून दिव्यातील नागरिकांना न्याय द्यायला हवा. मनसेचे प्रकाश पाटील यांचे उपोषण सोडवण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा.ते आमरण उपोषणाला बसले आहेत.आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे.पालिकेतील प्रमुख अधिकारी म्हणून इतकी तर जबाबदारी आयुक्तांनी घ्यायला हवी.नागरिकांना त्यांच्या हक्काचं पाणी द्यायला हवं. पाणी वितरण व्यवस्थेवर कायमचा तोडगा काढायला हवा… दिवा शहरातील नागरिक पालिका आयुक्तांचे लाख लाख आभार मानतील!

error: Content is protected !!