दिवा:- बुधवारी 9 ऑगस्ट रोजी दिवा रेल्वे स्थानकात लोकलच्या गोंधळामुळे महिला प्रवाशांनी मोटरमनच्या केबिनमध्ये प्रवेश केला होता.यानंतर दीपिका शिंदे या महिलेवर गुन्हा दाखल झाला.सदर प्रकार गर्दीमुळे झाला असल्याने दाखल झालेले गुन्हे रद्द करावेत अशी मागणी दिवा भाजपच्या महिला अध्यक्षा ज्योती पाटील यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
दिव्यात बुधवारी 9 ऑगस्ट रोजी सकाळी फलाट क्रमांक चार वर येणारी लोकल दोन वर आल्याने प्रवाशांचा एकच गोंधळ उडाला. या गोंधळामध्ये गर्दी झाल्याने एक महिला मोटरमन केबिनमध्ये चढली. त्यानंतर 15 ते 20 मिनिटं लोकल थांबून होती.मोटरमनच्या केबिनमध्ये प्रवेश करणारी महिला दीपिका शिंदे हिच्यावर रेल्वे ऍक्ट नुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून तिची जामीनावर सुटका करण्यात आली आहे. मात्र या महिलेने जाणीवपूर्वक कोणते कृत्य केले नसून गर्दीच्या वेळी झालेला हा प्रकार असल्याने,सदर महिलेवर दाखल झालेले गुन्हे रद्द करावेत अशी मागणी दिवा भाजपच्या महिला अध्यक्ष ज्योती पाटील यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. या संदर्भात दिवा स्टेशन मास्तर यांच्याकडे पत्रव्यवहार करण्यात आला असून आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे ज्योती पाटील यांनी म्हटले आहे.