उर्वरित११ विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरूच ; ताप आणि पोट दुखतेय
ठाणे : दिवा,आगासन येथील ठाणे महापालिकेच्या शाळा क्रमांक ८८ मध्ये वाटप करण्यात आलेल्या पोषण आहारातून ४० विद्यार्थ्यांना विषबाधा गुरुवारी विषबाधा झाली होती. त्या विद्यार्थ्यांना ठामपा कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. त्यापैकी २९ विद्यार्थ्यांना शुक्रवारी डिस्चार्ज देण्यात आल्याने ते घरी परतले आहेत. तर उर्वरित ११ विद्यार्थ्यांना ताप तसेच पोटात दुखत असल्याने त्यांच्यवर उपचार सुरू असल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली.
दिवा येथील ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक ८८ मध्ये गुरुवारी दुपारी विद्यार्थ्यांना पोषण आहार म्हणून खिचडी वाटप करण्यात आली. त्या खिचडीत पालही आढळून आली. दरम्यान खिचडी सेवन केल्यानंतर अचानक ४० विद्यार्थ्यांना उलटी आणि पोटदुखीचा त्रास जाणवू लागला. त्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, त्या विद्यार्थ्यांना तातडीने ठामपा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. महापालिका प्रशासनाने सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले होते. तसेच त्यांच्यावर उपचारही सुरू असल्याचे स्पष्ट केले. त्या ४० विद्यार्थ्यांपैकी २९ विद्यार्थ्यांना शुक्रवारी सायंकाळी उपचारानंतर डिस्चार्ज मिळाला. तर ११ विद्यार्थी अजूनही उपचारार्थ रुग्णालयात दाखल आहे. त्यांनाही लवकरच डिस्चार्ज देण्यात येईल असे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.






