Homeठाणे-मेट्रोदिवा शहराचा कायापालट करणे हेच शिवसेनेचे व्हिजन ; शैलेश पाटील यांनी व्यक्त...

दिवा शहराचा कायापालट करणे हेच शिवसेनेचे व्हिजन ; शैलेश पाटील यांनी व्यक्त केला विश्वास

दिवा:दिवा शहराचा सर्वांगीण विकास करून त्याला एक आदर्श शहर म्हणून नावारूपास आणणे हेच शिवसेनेचे मुख्य व्हिजन आहे, असे प्रतिपादन शिवसेना उप शहर प्रमुख आणि प्रभाग क्रमांक २७ चे उमेदवार शैलेश मनोहर पाटील यांनी केले आहे. दिवा शहरात गेल्या आठ वर्षांत झालेली कामे आणि आगामी नियोजित प्रकल्पांबाबत त्यांनी आपला ठाम विश्वास व्यक्त केला.

निधीचा ओघ आणि पायाभूत सुविधा
पाटील यांच्या मते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून गेल्या आठ वर्षांत दिवा शहरासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. यामुळेच आज दिवा शहरात दृश्य स्वरूपातील बदल पाहायला मिळत असून अनेक रखडलेली विकासकामे मार्गी लागली आहेत. विशेषतः दिवा-शीळ या मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरण वेगाने सुरू असून, यामुळे भविष्यात प्रवासाचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.

पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा
दिवा वासियांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या पाणीटंचाईवर बोलताना शैलेश पाटील म्हणाले की, दिवा-शीळ भागात नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर या भागातील पाणीटंचाई पूर्णतः निकालात निघेल. सध्या पाणी समस्या सोडवण्यात आम्हाला मोठ्या प्रमाणावर यश आले असून, आगामी काळात प्रत्येक नागरिकाला मुबलक पाणीपुरवठा उपलब्ध करून देणे ही आमची प्राथमिक भूमिका आहे.

नियोजनबद्ध विकास आणि आगामी संकल्पना
दिवा स्टेशन परिसराचा नियोजनबद्ध विकास करण्यासोबतच, दिवा पश्चिम भागातही विकासाची गंगा आणण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. केवळ रस्ते आणि पाणीच नव्हे, तर ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी विशेष उपाययोजना आणि नवनवीन संकल्पना राबवण्याचा मानसही त्यांनी बोलून दाखवला.

ज्या पद्धतीने मागील काही वर्षांत दिव्यात विकास होत आहे, ते पाहता येणाऱ्या काळात हे शहर एक आदर्श शहर म्हणून उदयास येईल,असा विश्वास शैलेश पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. सामान्य नागरिकांच्या अडचणी कायमस्वरूपी दूर करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी शेवटी नमूद केले.

error: Content is protected !!