विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते गौरव; सामाजिक कार्याची दखल
दिवा:- दिवा शहरातील युवा नेतृत्व आणि शिवसेना दिवा युवती अधिकारी कु.साक्षी रमाकांत मढवी यांना ‘लोकमत वुमन अचीवर ऑफ मुंबई ‘ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
विधानसभा अध्यक्ष श्री. राहुल नार्वेकर व मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते एका शानदार कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि महिला सक्षमीकरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा गौरव करण्यात आला.
आपले वडील माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालवत साक्षी मढवी गेल्या काही वर्षांपासून दिवा शहरातील सामाजिक ,शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय आहेत. शाळांमध्ये गुड टच बॅड टचचे कार्यक्रम,निबंध स्पर्धा,चित्रकला स्पर्धा,रक्तदान शिबिरे,दिव्यांगांना सहकार्य असे उपक्रम कु.साक्षी मढवी धर्मवीर मित्र मंडळ,शिवानंद प्रतिष्ठान व रमाकांत मढवी फाउंडेशन यांच्या वतीने मागील काही वर्षापासून राबवत आहेत.वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी आपल्या कार्याचा एक वेगळा ठसा उमटवला आहे.
साक्षी मढवी यांनी विशेषतः महिला आणि तरुणींसाठी भरीव कार्य केले आहे. शहरातील महिलांचे सक्षमीकरण, बचत गटांना प्रोत्साहन देऊन त्यांना आत्मनिर्भर बनवणे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करणे, तसेच गरजू नागरिकांसाठी वेळोवेळी आरोग्य शिबिरांचे आयोजन करणे अशा विविध उपक्रमांतून त्या नेहमीच अग्रेसर राहिल्या आहेत. यासोबतच, महिला आणि तरुणींमध्ये त्यांच्या सुरक्षिततेविषयी जनजागृती करण्यावरही त्यांनी विशेष भर दिला आहे.
त्यांच्या याच निस्वार्थ आणि सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत दैनिक ‘लोकमत’ समूहाने त्यांना ‘वुमन अचीवर ऑफ मुंबई ‘ या पुरस्कारासाठी निवडले. या पुरस्कारामुळे साक्षी मढवी यांच्या कार्याला एक मोठी पोचपावती मिळाली असून, विविध स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.