ठाणे महानगरपालिका प्रभाग रचनेवर हरकती आणि सूचनांसाठी प्रारूप अधिसूचन जारी
ठाणे:-ठाणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी नागरिकांकडून प्रभाग रचनेवर हरकती आणि सूचना मागवण्यासाठी सार्वजनिक प्रारूप अधिसूचना जारी करण्यात आली आहे.ज्या नागरिकांना या प्रभाग रचनेबाबत काही आक्षेप किंवा सूचना नोंदवायच्या असतील, त्यांना 4 सप्टेंबर 2025 पर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत लेखी स्वरूपात त्या हरकती ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे सादर कराव्या लागणार आहेत.
ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची प्रारूप अधिसूचना जाहीर झाली आहे. ही अधिसूचना, त्यातील सर्व नकाशे, मतदारसंघाची रचना या सर्व माहितीसह महानगरपालिकेच्या वेबसाईटवर नागरिकांसाठी उपलब्ध असून त्यावर 4 सप्टेंबर 2025 पर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत हरकती आणि सूचना नोंदवता येणार आहेत.नवीन प्रभाग रचनेनुसार, ठाणे महानगरपालिका क्षेत्रात एकूण ३३ प्रभाग असतील. या प्रभागांमध्ये सदस्यांची संख्या खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आली आहे:
◆ एकूण सदस्य: १३१
◆ चार सदस्यांच्या प्रभागांची संख्या: ३२
◆ तीन सदस्यांच्या प्रभागांची संख्या: १
या रचनेनुसार, एकूण प्रभागांची संख्या ३३ असणार आहे.
दिवा प्रभाग समितीची हद्दीतील रचना
दिवा प्रभाग समितीमध्ये खालील प्रभाग क्रमांकाचा समावेश असणार आहे.
◆ प्रभाग क्रमांक २७: दिवा, साबे, सद्गुरू नगर, आणि बी.आर. नगर या भागांचा समावेश असेल.
◆प्रभाग क्रमांक २८: आगासन, म्हातारडी, बेतवडे, दातिवली, भोलेनाथ नगर, आणि बेडेकर नगर हे भाग असतील.
◆ प्रभाग क्रमांक २९: दिवा, साबे, खर्डी, डावले, पडले, देसाई, सागर्ली, खिडकाली, डायघर, शीळ, कौसा तलाव, सोनखार, आणि डोमखार या भागांचा समावेश असेल.
या नवीन रचनेमुळे, दिवा शहरातील नगरसेवकांची संख्या वाढणार आहे. प्रभाग क्रमांक २७ आणि २८ मधून प्रत्येकी चार सदस्य निवडून दिले जातील, तर प्रभाग क्रमांक २९ मधून तीन सदस्य निवडले जातील. विशेष म्हणजे, पूर्वी प्रभाग क्रमांक २९ मध्ये फक्त दिवा खाडीपलीकडच्या वस्त्यांचा समावेश होता, मात्र आता दिवा शहरातील काही भागही यात जोडण्यात आला आहे.