दिवा:-शहरातील पाणीटंचाई असणाऱ्या भागातील पाणी प्रश्न लवकरात लवकर सोडवावा यासाठी दिवा भाजपच्या वतीने पालिकेच्या अधिकाऱ्यांना अल्टिमेटम देण्यात आला आहे. साबेगाव परिसरातील भगत वाडी, साळवी नगर, केदार पाटील चाळ , साबे गाव गणेश मंदिर परिसर, राधे कृष्ण सोसायटी तसेच त्याच्या आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना बरेच वर्षांपासून भीषण पाणी टंचाई चा सामना करावा लागत आहे.
अनेक वेळा महानगरपालिकेला तक्रार करून सुद्धा महानगरपालिका अत्यंत दुर्लक्ष करत आहे. पिण्याचे पाण्याचे बिल मात्र नियमित रित्या न चुकता नागरिकांना पोचवले जाते. टँकर चे पाणी विकत घेऊन त्याच्या मासिक खर्चावर अतिरिक्त भार मात्र आला आहे.
भारतीय जनता पार्टीने याविरोधात आवाज उठवत पालिकेला निवेदन दिले आहे. १० दिवसांमध्ये साबे गाव परिसरतील पाणी प्रश्न दिवा प्रभाग समितीच्या वतीने सोडवला नाही तर पर्यायाने तेथील नागरिकांना सोबत घेऊन भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने प्रभाग समितीसमोर ठिय्या आंदोलन केले जाईल असा इशारा भाजपने दिला आहे.
यावेळी दिवा भाजप मंडळ अध्यक्ष सचिन भोईर, नरेश पवार, विजय भोईर, विनोद भगत, रोशन भगत, अशोक पाटील, गणेश भगत, मधुकर पाटील, नितीन कोरगावकर, आधी पदाधिकारी व कार्यकर्ते, महिला उपस्थित होते.