Homeठाणे-मेट्रोदिवा शहरात प्रचाराचा धुरळा; १५ जानेवारीला मतदान, तर १६ ला फैसला!

दिवा शहरात प्रचाराचा धुरळा; १५ जानेवारीला मतदान, तर १६ ला फैसला!

प्रभाग २८ मध्ये शिंदेंची शिवसेना व ठाकरेंची शिवसेना यांच्यात मुख्य लढत होण्याची शक्यता तर प्रभाग २७ मध्ये शिंदेंची शिवसेना विरुद्ध मनसे यांच्यात मुख्य लढत

काही जागांवर शिंदे यांची शिवसेना, शिवसेना ठाकरे गट आणि मनसेमध्ये त्रिकोणी लढत

दिवा :ठाणे महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर आता दिवा शहरातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. प्रचारात सर्वच पक्षांनी आपली पूर्ण ताकद मैदानात उतरवली आहे. येत्या १५ जानेवारीला मतदान होणार असून १६ जानेवारीला मतमोजणी पार पडणार आहे. यामुळे दिवा शहराचा कौल नक्की कोणाला? याची उत्सुकता संपूर्ण दिवा शहरात शिगेला पोहोचली आहे.

सत्ताधारी झालेल्या पक्षाकडूनविकासाच्या मुद्द्यांवर भर तर विरोधी पक्षांकडून दिवा शहरातील नागरी समस्या जनतेसमोर मांडत प्रचार

निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप युतीने मागील काही वर्षात केलेल्या विकासाच्या मुद्द्यांवर आपला प्रचार केंद्रित केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या भागात रस्ते, पाणी आणि पायाभूत सुविधांचा हवाला देत मतदारांना साद घातली जात आहे. दुसरीकडे, विरोधी पक्षांनी दिवा शहरातील रखडलेली कामे, हॉस्पिटल, पाणी समस्या, डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न, शिक्षण आणि अपुऱ्या सोयीसुविधांवरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. आता दिव्यातील जनता कोणाच्या बाजूने उभे राहते हे 15 तारखेनंतर कळणार आहे.
प्रभागांमधील चुरशीची समीकरणे:
दिवा शहरात मुख्य आठ जागांसाठी ही निवडणूक होत असून, प्रभाग क्रमांक २९ मधील तीन जागांसह एकूण ११ जागांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. सध्याची राजकीय स्थिती पाहता प्रभागांमधील चित्र खालीलप्रमाणे स्पष्ट होत आहे:
प्रभाग क्रमांक २७: या प्रभागात मुख्य लढत शिवसेना (शिंदे गट) विरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात होताना दिसत आहे. मनसेने या ठिकाणी पूर्ण पॅनल मैदानात उतरवले असल्याने शिवसेना शिंदे गटविरुद्ध मनसे अशीच लढत येथे होताना दिसत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे दोन उमेदवार सुद्धा या ठिकाणी रिंगणात आहेत.त्यामुळे त्या दोन ठिकाणी तिरंगी लढत होईल असे बोलले जात आहे.
प्रभाग क्रमांक २८: येथे दोन्ही शिवसेना आमने-सामने आहेत. शिवसेना (शिंदे गट) विरुद्ध शिवसेना (ठाकरे गट) अशी सरळ लढत होत असून, या प्रभागात मनसेने दोन उमेदवार उभे आहेत. काही ठिकाणी तिरंगी लढत होत असल्याने मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात मतांचे विभाजन झाल्यास या मतांच्या विभाजनाचा फटका कोणाला बसणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मतांचे सरळ सरळ विभाजन झाल्यास याचा थेट फायदा शिवसेना शिंदे गटाला होईल असेही बोलले जात आहे.
प्रभाग क्रमांक २९: या प्रभागात शिवसेना (शिंदे गट) व भाजप युती विरुद्ध शिवसेना (ठाकरे गट) अशी लढत होत आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार सुद्धा रिंगणात आहेत.
बंडखोरी आणि मतांचे विभाजन ठरणार निर्णायक?
पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच महापालिका निवडणुका होत असल्याने दिव्यातील शिवसैनिक कोणाच्या पाठीशी उभा राहतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. प्रभाग २८ मध्ये मनसेचे उमेदवार आणि प्रभाग २७ मध्ये ठाकरे गटाचे दोन उमेदवार असल्याने मतविभाजनाचा धोका वाढला आहे. याचा थेट फायदा शिंदे गटाला होणार की मतदार नव्या पर्यायाला पसंती देणार, याचे उत्तर १६ तारखेलाच मिळेल.
शिवसेना शिंदे गट अत्यंत एकजुटीने आणि आक्रमकपणे प्रचार करत असताना, ठाकरे गट आणि मनसेनेही वैयक्तिक जनसंपर्क आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्यात आघाडी घेतली आहे. सर्वच नगरसेवक पदाचे उमेदवार हे आपापल्या भागात तेपर्यंत आपली भूमिका पोहोचवण्यासाठी अतोनात मेहनत घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.या निवडणुकीत वंचित ने ही दिवा शहरात उमेदवार दिल्याने वंचित ची ताकद किती? हे या निवडणुकीच्या निकालानंतर करणार आहे. त्याचबरोबर काही सामाजिक कार्यकर्ते अपक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात असून मतदार त्यांनाही कौल देतात काहीही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

error: Content is protected !!