फेरीवाले हटविण्यासाठी महापालिकेकडे मनुष्य बळ नसेल तर प्रभाग समिती खासगी कंपनीला चालवायला द्या,दिवा मनसेची टीका
दिवा:- दिवा शहरातील रस्ते आणि पदपथ फेरीवाल्यांनी व्यापले असून, नागरिक त्रस्त झाले आहेत. असे असतानाही ठाणे महानगरपालिका कोणतीही ठोस कारवाई करताना दिसत नाही. धक्कादायक बाब म्हणजे, दिवा प्रभाग समितीकडे फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळच उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे, ज्यामुळे पालिकेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
फेरीवाल्यांच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेने सायंकाळी ६ ते रात्री ९.३० या वेळेत विशेष पथक सुरू केले होते. मात्र, मनुष्यबळ नसल्याने सायंकाळी ६ नंतर कारवाईसाठी कर्मचारीच उपलब्ध नसतात, असे चित्र आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) शहर सचिव प्रशांत गावडे यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष वेधले आहे. त्यांच्या मते, पालिकेच्याच कर्मचाऱ्यांकडून ही माहिती मिळाली असून, कारवाईसाठी आवश्यक वाहने आणि इतर साधनेही उपलब्ध करून दिली जात नसल्याचे समजते.
“जर फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासारख्या मूलभूत प्रशासकीय कामासाठी महापालिकेकडे मनुष्यबळ नसेल, तर त्यांनी दिवा प्रभाग समितीचे काम एखाद्या खाजगी कंपनीला द्यावे,” असा उपरोधिक सल्ला गावडे यांनी दिला आहे. पालिकेच्या या असहाय्यतेमुळे फेरीवाल्यांचे फावले असून, ते रस्त्यांवर पुन्हा बस्तान मांडत असल्याचे चित्र आहे.
कारवाईचा केवळ फार्स?
काही काळापूर्वी, दिवा प्रभाग समितीचे साहाय्यक आयुक्त शिवप्रसाद नागरगोजे यांनी उपलब्ध मनुष्यबळातून सकाळ आणि संध्याकाळच्या सत्रात दोन पथके नेमून फेरीवाल्यांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, मनसेच्या आरोपानुसार सायंकाळचे पथक केवळ कागदावरच असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी भारतीय जनता पक्षानेही या प्रश्नावर आंदोलन केले होते, मात्र त्यानंतरही परिस्थितीत कोणताही ठोस बदल झालेला नाही. कारवाई झाली तरी, पथक परत जाताच फेरीवाले पुन्हा आपले बस्तान मांडतात, हा नित्याचाच अनुभव आहे.
दिवा स्टेशन रोड, मुंब्रादेवी कॉलनी, आगासन रोड यांसारख्या वर्दळीच्या ठिकाणी फेरीवाल्यांनी पदपथ आणि रस्ते अडवल्यामुळे पादचाऱ्यांना चालणेही मुश्किल झाले आहे. यामुळे वाहतूक कोंडीची समस्याही गंभीर बनली आहे. प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून, महापालिका केवळ आश्वासने देण्यापलीकडे काहीच करत नसल्याचा आरोप होत आहे. आता तरी प्रशासन यावर काही ठोस उपाययोजना करणार का, याकडे दिवेकरांचे लक्ष लागले आहे.






