पालकांना भरमसाठ फी भरावी लागते,दर्जेदार मोफत शिक्षण मिळण्यासाठी शाळांची संख्या वाढवण्याची ज्योती पाटील यांची मागणी
दिवा:- वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात दिवा शहरात महापालिकेच्या मराठी,हिंदी,सेमी इंग्रजी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करून खाजगी शाळांची मनमानी मोडीत काढावी. पालकांना दिलासा देऊन विद्यार्थ्यांना मोफत दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून द्यावे अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या दिवा शहर संघटिका ज्योती पाटील यांनी ठाणे महापालिका आयुक्त व शिक्षणाधिकारी यांच्याकडे केले आहे. तसे पत्र ज्योती पाटील यांनी दिलेआहे.
ठाणे महानगरपालिका आयुक्त व शिक्षणाधिकारी यांना दिलेल्या पत्रात ज्योती पाटील यांनी म्हटले आहे की,शहराची लोकसंख्या मागील दहा वर्षात प्रचंड वाढली आहे. मात्र वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात या ठिकाणी महानगरपालिकेच्या शाळांची संख्या वाढली नाही. परिणामी येथील नागरिकांना शहरातील अनधिकृत खासगी शाळांमध्ये महागडी फी खर्च करून शिक्षण घ्यावे लागते. अनेक शाळा या विद्यार्थी व पालकांना वेठीस धरतात.
आपल्या महानगरपालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना ठाणे महानगरपालिके मार्फत मोफत शिक्षण दिले जाते. मात्र दिव्यातील बहुतांश सर्वसामान्य नागरिकांचे विद्यार्थी हे या मोफत शिक्षणापासून वंचित राहत आहेत.शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन या ठिकाणी महानगरपालिकेच्या शाळांची संख्या वाढवावी. ज्या ठिकाणी महानगरपालिकेच्या शाळा आहेत त्याच ठिकाणी इमारतीचे नवे बांधकाम करून वर्ग संख्या वाढवावी. त्याचबरोबर दहावीपर्यंत मोफत शिक्षणाची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात यावी अशी आग्रहाची मागणी ज्योती पाटील यांनी या पत्राद्वारे केली आहे.
दिवा शहरात मराठी,हिंदी, सेमी इंग्रजी आणि इंग्रजी माध्यमाच्या महानगरपालिकेच्या शाळा सुरू कराव्यात अशी विनंती ज्योती पाटील यांनी केली आहे. शहरातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेला त्यांच्या पाल्यांना शिकवण्यासाठी मोफत दर्जेदार शिक्षण आपण ठाणे महानगरपालिके मार्फत उपलब्ध करावे व खाजगी शाळांची मनमानी मोडीत काढावी असेही ज्योती राजकांत पाटील यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.






