Homeशहर परिसरदिवा शहरात रोज ५ ते ६ तास वीज गायब; मनसेच्या शिष्टमंडळाने टोरंट...

दिवा शहरात रोज ५ ते ६ तास वीज गायब; मनसेच्या शिष्टमंडळाने टोरंट पॉवरच्या अधिकाऱ्यांची घेतली भेट

दिवा :- शहरात गेले काही दिवस रोज ५ ते ६ तास विजपुरवठा खंडित होत असून वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिकांचे जगणे असह्य बनले आहे. यासंदर्भात आज मनसेच्या शिष्टमंडळाने शहर अध्यक्ष तुषार पाटील यांच्या सूचनेनुसार टोरंट पॉवरच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली.

सध्या उन्हाचा पारा वाढल्याने आधीच प्रचंड उकाडा निर्माण झाला आहे. त्यातच रोज ५ -६ तास लाईट जात असल्याने विद्यार्थी, वृद्धांना आणि व्यावसायिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी काही काळ वीजपुरवठा बंद करणे हे समजण्यासारखे आहे परंतु वारंवार जर विजपुरवठा खंडित होत असेल तर नेमकं कसली देखभाल दुरुस्ती केली जातेय असा प्रश्न मनसे शिष्टमंडळाने उपस्थित केला आहे.

दिवा शहरातील काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बांधकामे होत असल्याने रोज नवीन कनेक्शन वाढत आहेत, पण त्याला आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा वाढत नसल्याने जुन्या ट्रान्सफॉर्मर वर लोड येऊन काही स्थानिक ठिकाणी वीजपुरवठा खंडित होत आहे. नवीन ट्रान्सफॉर्मर लावण्यासाठी बिल्डर जागाच देत नसल्याने नवीन पायाभूत सुविधा उभारण्यात अडचण येत असून त्यामुळेच काही विभागांमध्ये विजेचा दाब वाढून वीजपुरवठा खंडित होत आहे असे टोरंट प्रशासनाने म्हटले आहे.

देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी घेण्यात येणाऱ्या वेळेचे नियोजन करून वीजपुरवठा जास्त वेळ बंद राहणार नाही याबाबत आम्ही नक्कीच पुढच्या ७- ८ दिवसात प्रयत्न करू असे आश्वासन टोरंट पॉवरच्या अधिकाऱ्यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला दिले आहे. यावेळी मनसेचे दिवा शहर सचिव प्रशांत गावडे, विभाग अध्यक्ष देवेंद्र भगत, प्रकाश पाटील, शरद पाटील आणि विभाग सचिव परेश पाटील हे पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!