Homeठाणे-मेट्रोदिवा शहर पातळीवर मनसे - शिवसेना ठाकरे गट पहिल्यांदा एकत्र

दिवा शहर पातळीवर मनसे – शिवसेना ठाकरे गट पहिल्यांदा एकत्र

ठाण्यातील सोमवारच्या मोर्चासाठी दिव्यात ‘मनसे-शिवसेना ठाकरे गट’ बैठक संपन्न

दिवा:- ठाणे महानगरपालिकेच्या भ्रष्ट कारभाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना ठाकरे गट यांच्या सोमवारी निघणाऱ्या ‘निर्धार मोर्चा’च्या निमित्ताने दिवा शहरात पहिल्यांदाच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. दोन्ही पक्ष दिवा शहर पातळीवर एकत्र आल्याने दिव्यातील राजकीय समीकरणे बदलणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ठाणे शहर आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मनसे आणि ठाकरे गटाचे शिवसैनिक विविध विषयांवर एकत्र येत असताना, दिव्यात मात्र आतापर्यंत या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्र आले नव्हते. मात्र, सोमवारी ठाणे महापालिकेच्या विरोधात आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी दिव्यात मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली.

मनसेच्या कार्यालयात झालेल्या या बैठकीला मनसेचे शहर अध्यक्ष तुषार पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे आणि शहरप्रमुख सचिन पाटील यांच्यासह संघटिका ज्योती पाटील, विधानसभा संघटिका योगिता नाईक, मनसेचे प्रशांत गावडे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणे महापालिकेच्या भ्रष्ट कारभाराविरोधात सोमवारी होणाऱ्या मोर्चात दिव्यातून मोठ्या संख्येने एकत्रित सामील होण्याचा आणि ताकदीने उतरण्याचा निर्धार केला. तसेच, दिवा शहरातील नागरिकांनीही महापालिकेच्या कारभाराविरोधात आवाज उठवण्यासाठी या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन दोन्ही पक्षांच्या वतीने करण्यात आले.

दिवा शहराच्या राजकारणावर परिणाम?
अन्य शहरांमध्ये ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन याआधीच झाले होते, मात्र दिव्यात पहिल्यांदाच ही संयुक्त बैठक संपन्न झाली आहे. ठाणे महापालिकेच्या भ्रष्ट कारभाराविरोधातील या मोर्चाच्या निमित्ताने मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र ताकतीने उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दिवा शहराच्या भविष्यातील राजकारणावर या एकत्रित मोट बांधणीचा काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

error: Content is protected !!