दिवा:-शाळेमध्ये अनोळखी इसम येऊन लहान मुलींची छेड काढतो. शाळा प्रशासन याकडे गांभीर्याने न पाहता हलगर्जीपणा करत असेल आणि अद्याप आरोपीला अटक होत नसेल तर ही गंभीर बाब असून दिवा शाळा प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करा अन्यथा पालकांचा मोर्चा पोलीस ठाण्यावर धडकेल असा इशारा शिवसेना ठाकरे गटाच्या दिवा शहर संघटिका ज्योती पाटील यांनी दिला आहे.
दिव्यातील स्मार्ट इंग्लिश स्कूल शाळेत घडलेला प्रकार हा गंभीर असून शाळा प्रशासनाने अनोळखी इसमास वर्गात कसे येऊ दिले?लहान मुलींसमोर त्यांनी केलेले कृत्य गंभीर बाब असून शाळा प्रशासनाने याबाबत उत्तर द्यायला हवे. अशा शाळांमध्ये दिव्यातील विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात असून लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. दुष्कृत्य करणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी पालकातून होत असतानाही अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. तातडीने या प्रकरणी वरिष्ठ अधिकारी लक्ष घालून सदर आरोपीला अटक करावी अन्यथा पालकांच्या वतीने पोलीस ठाणकावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला शहर संघटिका ज्योती पाटील यांनी दिला आहे.