दिवा :- सध्या दिवा-शीळ रस्ता या ४ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे रुंदीकरण आणि काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. या रस्त्यावर नव्याने दुभाजक (डिवायडर) बांधले जात आहेत. हे दुभाजक अशा प्रकारे बांधण्यात यावेत की त्यामध्ये झाडे लावण्याची व्यवस्था करता येईल. अशी मागणी मनसेचे दिवा शहर सचिव प्रशांत गावडे यांनी केली आहे.
झाडांमुळे परिसरातील तापमान नियंत्रित राहील आणि प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. तसेच रस्त्यावर हिरवळ निर्माण झाल्याने रस्त्याचेही सौंदर्य वाढेल. झाडांमुळे ऑक्सिजनची निर्मिती होईल आणि वाहनांमधून निघणाऱ्या कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. झाडे योग्य अंतरावर लावल्यास रात्रीच्या वेळी समोरील वाहने थेट न दिसता प्रकाश पसरतो, ज्यामुळे अपघातांचे प्रमाण देखील कमी होण्यास मदत होईल.
त्यामुळे, दुभाजक बांधताना त्यात झाडे लावता येतील अशा पद्धतीने त्यांची रचना करण्यात यावी. तसेच, भविष्यात त्यांची देखभाल आणि संगोपन यावरही लक्ष द्यावे अशी मागणी मनसेने आपल्या पत्रातून केली आहे.