सोसायटी अंतर्गत रस्ता केल्याबद्दल नागरिकांच्या वतीने रमाकांत मढवी यांचा सत्कार
दिवा:- दिवा शीळ दरम्यान टाकल्या जाणाऱ्या पाण्याच्या पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर दिवा, साबे गाव व त्या भागातील पाणी प्रश्न कायमचा सुटेल, त्याचबरोबर अन्य भागातील भविष्यातील नियोजन म्हणून टाकलेल्या पाण्याच्या लाईन यातूनही मुबलक पाणीपुरवठा सुरू होईल असे वक्तव्य माजी उपमहापौर व शिवसेना शहर प्रमुख रमाकांत मढवी यांनी दिवा आगासन रोड भागात आयोजित एका सत्कार सोहळ्याप्रसंगी केले.
इमारतीच्या अंतर्गत भागातील रस्ते काँक्रीटचे करून दिल्याबद्दल श्री साई गणेश मित्र मंडळाच्या वतीने माजी उपमहापौर व दिवा शहर प्रमुख रमाकांत मढवी यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. रहिवाशांच्या हस्ते मढवी यांचा सत्कार सोहळा पार पडला.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून याच वेळी दिव्याचा लंबोदर गणेशोत्सवाचे टी-शर्ट अनावरणही श्री रमाकांत मढवी यांच्या हस्ते करण्यात आले. रमाकांत मढवी यांच्या पुढाकाराने दिवा शहरातील इमारतींच्या अंतर्गत रस्त्यांचे मजबुतीकरण होत असल्याच्या निमित्ताने श्री साई गणेश मित्र मंडळाच्या वतीने हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना ऍड.आदेश भगत यांनी रमाकांत मढवी यांच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांची माहिती उपस्थित नागरिकांना दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील अनधिकृत बांधकामावरील दंड रद्द केल्याची माहिती देताना आदेश भगत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.यावेळी शिवसेना उपशहर प्रमुख आदेश भगत, विभाग प्रमुख निलेश पाटील यांच्यासह युवराज यादव इतर शिवसैनिक तसेच इमारतीमधील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.