Homeठाणे-मेट्रोदिवा: सदाशिव दळवी नगर येथील रस्त्यांच्या दुर्दशेविरोधात अमोल केंद्रे यांचे 'धडाकेबाज' आंदोलन

दिवा: सदाशिव दळवी नगर येथील रस्त्यांच्या दुर्दशेविरोधात अमोल केंद्रे यांचे ‘धडाकेबाज’ आंदोलन

दिवा:- दिवा शहरातील सदाशिव दळवी नगर, एंजल पॅराडाईज शाळेच्या बाजूला असलेला नारायण भगत नगर ते दिवा स्टेशनकडे जाणारा रस्ता अत्यंत दयनीय अवस्थेत असून, याविरोधात ‘धडाकेबाज युवा प्रतिष्ठान’चे अध्यक्ष तथा समाजसेवक अमोल केंद्रे यांनी आज भर पावसात तीव्र आंदोलन केले. रस्त्यावर सांडपाणी वाहत असल्याने नागरिक आणि विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्याची दुरवस्था झाली असून, जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यातच, या रस्त्यावर संडासाचे पाणी येत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शाळकरी मुलांना आणि सामान्य नागरिकांना याच घाणीच्या पाण्यातून मार्गक्रमण करावे लागत असल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
याच पार्श्वभूमीवर, समाजसेवक अमोल केंद्रे यांनी आज ‘धडाकेबाज युवा प्रतिष्ठान’च्या वतीने भर पावसात आंदोलन छेडले. यावेळी त्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध करत, जनतेला तातडीने न्याय मिळावा अशी मागणी केली. “रस्त्यांची ही दुर्दशा प्रशासनाच्या असंवेदनशीलतेचे प्रतीक आहे. नागरिक आणि विशेषतः शाळकरी मुलांना या घाणीच्या पाण्यातून जावे लागत असताना प्रशासन गप्प का आहे?” असा सवाल केंद्रे यांनी उपस्थित केला.
केंद्रे यांनी यावेळी प्रशासनाला तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्याची आणि सांडपाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली.

error: Content is protected !!