दिवा :- दिवा स्टेशन परिसरातील वाढत्या फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे होणारी वाहतूक कोंडी आणि नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन,मंगळवारी दिवा प्रभाग समिती आणि मुंब्रा पोलीस स्टेशन यांनी संयुक्तपणे धडक कारवाई केली. सायंकाळी ५.३० ते ६.४० या वेळेत दिवा चौक ते दिवा स्टेशन रोडदरम्यान सुमारे ३५ ते ४० अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करत त्यांच्या हातगाड्या आणि विक्रीचे साहित्य जप्त करण्यात आले.
या कारवाईत दिवा प्रभाग समितीच्या अधिकाऱ्यांसह मुंब्रा पोलीस ठाण्याच्या दिवा चौकीचे ४ अधिकारी, २० अंमलदार, रॅपिड ॲक्शन फोर्स (RCP) चे १३ जवान आणि अन्य कर्मचारी सहभागी झाले होते. फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे परिसरात वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत असल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर ही संयुक्त कारवाई करण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या मोहिमेमुळे दिवा परिसरात अतिक्रमणमुक्त व्यवस्था निर्माण होण्यास मदत होईल आणि वाहतूक अधिक सुरळीत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






