शिवसेना उपशहरप्रमुख अँड.आदेश भगत यांनी सहाय्यक आयुक्तांना दिली निवेदनासोबत उच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रत
दिवा स्टेशन पूर्व परिसरात होणारी वाहतूक कोंडी सर्वश्रुत आहे. स्टेशन परिसरात रस्त्याच्या दुतर्फा बसलेल्या फेरीवाल्यांमुळे व बेशिस्त रिक्षाचालकांमुळे नागरिकांना येथून मार्ग काढणे कठीण झाले आहे. दिवा शहरात स्थायिक झालेला बहुतांशी नागरिक हा मध्यमवर्गीय असल्याने ९० टक्के पेक्षा जास्त नागरिक हा रेल्वे ने प्रवास करतो, परिणामी दिवा स्टेशन परिसर नेहमी गजबजलेला असतो. रेल्वे स्थानकात होणारी गर्दी व रेल्वे परिसरात रिक्षा, बस व छोटे मोठे व्यापार करणारे व्यापारी यामुळे या ठिकाणी नेहमीच अप्रिय घटना घडण्याची शक्यता असते आणि त्यामुळे माननीय उच्च न्यायालयाने या संदर्भात कठोर आदेश देऊन सर्वच रेल्वे स्थानकांपासून १५० मीटर परिसर हा फेरीवाला मुक्त, ट्रॅफिक मुक्त ठेवावा असे स्थानिक प्राधिकरणाला सांगितले आहे.
या संदर्भात अँड आदेश भगत यांनी यापूर्वी देखील महापालिकेला लेखी तक्रार केलेली आहे, परंतु प्रशासनातर्फे यावर ठोस अशी कारवाई झालेली नाही. माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दिवा स्टेशन परिसर फेरीवाला व ट्रॅफिक मुक्त ठेवण्यासाठी १५० मीटर परिसरातील फेरीवाले आणि बेशिस्त रिक्षाचालक यांच्यावर कठोर कारवाई करून नागरिकांना दिलासा द्यावा तसेच उच्च न्यायालयाच्या या निर्देशांचे पालिकेला स्मरण व्हावे याकरिता अँड आदेश भगत यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रत दिवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त यांना दिली.
दिवा शहराची लोकसंख्या चार ते पाच लाखाच्या घरात असून दिवा शहरात स्थायिक झालेले नागरिक हे सामान्य व अतिसामान्य वर्गातले आहेत. दिवा शहरातून आपल्या कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी रस्ते वाहतूक ही अधिक वेळ खाऊ व खर्चिक असल्याने 90% पेक्षा जास्त नागरिक हे रेल्वे सेवेवर अवलंबून आहेत आणि त्यामुळेच सर्व नागरिक हे रेल्वेत चढण्या उतरण्यासाठी दिवा स्टेशन परिसरात येत-जात असल्याने हा परिसर नेहमीच गजबजलेला असतो. दिवा स्टेशन परिसरात बस्थान मांडलेले फेरीवाले व बेशिस्त रिक्षा चालक यामुळे येथे नेहमीच प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी असते. याशिवाय दिवा पूर्व आणि दिवा पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे काम दिवा स्टेशन परिसरात सुरू असल्याने व त्यासाठी उभारण्यात आलेल्या पिलर व खोदलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना नीट चालणे सुद्धा शक्य होत नाही. याशिवाय या परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे मध्य रेल्वेचा रेल्वे फाटक हा बराच काळ उघडा राहिल्याने त्याचा त्रास रेल्वे सेवेवर होतो. परिणामी बऱ्याच वेळा लोकल सेवा दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावतात. या होणाऱ्या वाहतूक कोंडी संदर्भात मध्य रेल्वे प्रशासनाने ठाणे महानगरपालिकेकडे तसेच शहर वाहतूक नियंत्रण विभागाकडे यापूर्वीच लेखी तक्रारी केल्या असल्याचे कळते. परंतु पालिकेतर्फे या समस्येवर अद्यापही कोणताही कायमस्वरूपी तोडगा काढण्यात आलेला नाही.
दिवा स्टेशन पासून १५० मीटर परिसरात वाहतूक कोंडी साठी कारणीभूत असणाऱ्या फेरीवाल्यांवर व बेशिस्त मुजोर रिक्षाचालकांवर तातडीने कारवाई करावी व दिवा स्टेशन पासून १५० मीटर परिसरात सद्यस्थितीत असलेला रिक्षा स्टॅन्ड उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईपर्यंत इतरत्र ठिकाणी स्थलांतरित करावा अशी लेखी मागणी शिवसेना उपशहरप्रमुख अँड आदेश भगत यांनी सहायक आयुक्त यांच्याकडे केली.






