प्रकाश पाटील यांचे आमरण उपोषण स्थगित, सोमवारपासून प्रभाग समिती कार्यालयात ठिय्या
दिवा:-दिव्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी उपोषणाला बसलेले प्रकाश पाटील यांच्या आमरण उपोषणाची दखल ठाणे महापालिका प्रशासनाने घेतली नाही व मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर येत्या सोमवार नंतर दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्तांच्या केबिनमध्ये ठिय्या आंदोलन करू व त्यानंतर ही प्रश्न सुटला नाही तर थेट पालिका आयुक्तांच्या केबिनमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठिय्या आंदोलन करेल असा इशारा मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दिवा येथे आंदोलन स्थळी भेट दिल्यानंतर दिला. दरम्यान प्रकाश पाटील यांचे आमरण उपोषण मनसे नेते अविनाश जाधव यांच्या हस्ते ज्यूस देऊन सोडवण्यात आले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष प्रकाश पाटील हे दिवा स्टेशन येथे दिव्यातील पाणी समस्या सुटावी यासाठी आमरण उपोषणाला बसले होते. मात्र प्रकाश पाटील यांचं उपोषण सोडवण्यात महापालिका प्रशासनाला अपयश आले. महापालिका प्रशासनाने अद्याप कोणतेही ठोस भूमिका न घेतल्याने नागरिक व मनसे कार्यकर्त्यांमध्ये पालिका प्रशासना विरोधात संताप आहे.याच पार्श्वभूमीवर आज मनसे नेते अविनाश जाधव यांनी उपोषण करते प्रकाश पाटील यांची भेट घेत पाणी प्रश्न तात्काळ न सोडवला गेल्यास ठाणे महापालिका प्रशासनाविरोधात जनआंदोलन उभे केले जाईल असा इशाराच पालिका प्रशासनाला दिला आहे. येत्या सोमवारनंतर याप्रकरणी ठोस भूमिका पालिका प्रशासनाने न घेतल्यास पालिका आयुक्तांच्या केबिनमध्ये ठिय्या आंदोलन केले जाईल असा इशारा यादरम्यान अविनाश जाधव यांनी दिला आहे. पालिका प्रशासन ठोस भूमिका घेत नसल्याने व ज्या मागण्या आहेत त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने सोमवारपासून याबाबत प्रभाग समिती कार्यालय व महापालिका मुख्यालय येथे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देत विभाग अध्यक्ष प्रकाश पाटील यांचे उपोषण मनसे नेते अविनाश जाधव यांच्या उपस्थितीत स्थगित करण्यात आले.