ठाणे:- ठाणे महापालिका हद्दीतील दिवा शहर पुन्हा एकदा चर्चेचा केंद्रबिंदू ठरताना दिसत आहे. निमित्तही तसेच आहे. ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागामार्फत नुकताच प्रकाशित केलेल्या पर्यावरण अहवालावरूनच समोर आले आहे. त्या अहवालात ठाणे शहराप्रमाणे दिवा शहराची हवा बिघडलीच नाहीतर दिव्याचा आवाजही वाढल्याचे त्या अहवालात स्पष्ट म्हटले आहे. यामध्ये प्रामुख्याने दिव्यातील दिवा डम्पिंग, दिवा स्टेशन येथे हवा प्रदूषणाची पातळी मध्यम प्रदुषित गटात मोडली गेली असून दिवा डम्पिंग नाका आणि दातीवली विसर्जन घाट हे दोन ठिकाण ध्वनी प्रदूषण प्रखरतेने वाढले आहे. याबाबी दिवेकरांच्या आरोग्याबाबत धोक्याची घंटा तर वाजवत नाही अशी चर्चा सुरू आहे.
ठाणे महापालिकेच्या माध्यमातुन नुकताच २०२३-२४ चा पर्यावरण सद्यस्थिती अहवाल सादर झाला आहे. ठाणे महापालिकेच्या प्रदुषण नियंत्रण विभागाने हवा गणुवत्ता मापनासाठी निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक अशा तीन क्षेत्राची विभागणी केली होती. तेथील हवेतील प्रदुषकांचे मापन करण्यात आले. शिवाय हवेची गुणवत्ता मानप करण्यासाठी शहरातील हवा प्रदुषकांचे हॉटस्पॉटचे निरिक्षण करण्यात आले. तसेच दिवा डम्पींग ग्राऊंड, दिवाळी सणाच्या कालावधीत व नंतर हवा प्रदुषणात वाढ झाली का? याचे देखील निरिक्षण करण्यात आले आहे. त्यानुसार शहरातील ३० हॉटस्पॉट नाक्यांचे मापन करण्यात आले आहे. यात ३० पैकी २३ नाक्यावरील हवा ही मध्यम प्रदुषित गटात मोडल्याचे दिसून आले. यामध्ये
नितीन कंपनी, किसननगर नाका, शास्त्री नगर, बाळकुम, गावदेवी नाका, लोकमान्य नगर, विटावा, कोर्ट नाका, कापुरबावडी नाका, शिळफाटा, दिवा डम्पींग ग्राऊंड, जांभळी नाका, इंदिरा नगर, वर्तक नगर, ढोकाळी मार्केट, कासारवडवली मार्केट, कळवा भाजी मार्केट, मुंब्रा स्टेशन, दिवा स्टेशन, कोपरी राऊत शाळा, तीन हात नाका, सॅटीस नौपाडा आदी भागांचा समावेश आहे. याठिकाणी वाहनांची वर्दळ, वाहतुक कोंडी, घोडबंदर भागात सुरु असलेली मेट्रोची कामे आदींमुळेच येथील प्रदुषणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. तेथील मध्यम प्रदुषित गटाची हवेची गुणवत्ता ही १०० पेक्षा अधिक आढळून आली आहे.
दिव्याची हवा बिघडण्यास डम्पिंग वरील आगी आणि दुर्गंधी कारणीभूत…..
ठाणे शहराप्रमाणे दिव्यातील हवा प्रदुषण हे मध्यम प्रदुषित गटात मोडली गेली आहे. त्यातच दिवा डम्पिंग जरी बंद झाले असेल तरी, तेथे वारंवार लागणाऱ्या आगीच्या घटना तसेच डम्पिंगवरील दुर्गंधी अद्यापही बंद झालेली नसल्याचे दिसून आले आहे. ही प्रमुख कारणे आहेत.
विसर्जन घाटावर ध्वनी प्रदूषण….
शहरातील शांतता क्षेत्रातही ध्वनी प्रदुषणात लक्षणीय वाढ झाल्याचे त्या अहवालात म्हटले आहे. ठाण्यात २० ठिकाणी गणेशोत्सव विसर्जन केले जात आहे. त्या सर्वच ठिकाणी ही ध्वनीची तीव्रता ही मर्यादेपेक्षा जास्त आढळून आल्याची धक्कादायक पुढे आली आहे. त्यातही कळवा विसर्जन घाट, रेती बंदर विसर्जन, खारेगाव विसर्जन घाट आणि दातीवली विसर्जन घाट येथे ध्वनीची पातळी अधिक वाढल्याचे दिसून आले आहे.
या चौकात ध्वनी प्रदुषणात दिसते वाढ…
ठाण्यातील कॅडबरी नाका, नितिन कंपनी, मुलुंड चेक नाका, शास्त्री नगर नाका, उपवन बस डेपो, गावदेवी नाका, ब्रम्हांड, शिळफाटा, कल्याणफाटा, जांभळी नाका, दिवा डम्पींग, कळवा भाजी मार्केट, सॅटीस नौपाडा या भागातील ध्वनी प्रदुषणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे.