दिवा भाजप शिष्टमंडळ व नागरिकांनी घेतली मंत्री नाईक यांची भेट
ठाणे:-जनता दरबारातूनच भाजपचे ठाणे जिल्हा संपर्क मंत्री गणेश नाईक यांनी दिव्यातील अनंत पार्क रहिवाश्यांच्या बिल्डिंग तोडण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना सदर कारवाई थांबवण्याचे आदेश देत नागरिकांची बाजू मांडण्यासाठी अवधी देण्यात यावा यासाठी देखील महापालिका, महाराष्ट्र शासन आणि मा.न्यायालयाला आवाहन करणार असल्याची भूमिका मांडली.यावेळी भाजपाच्या शिष्टमंडळाने मंत्री गणेश नाईक यांचे आभार मानले.
दिवा पूर्व येथील आनंद पार्क सोसायटीतील तीन बिल्डिंग मधील रहिवाशांच्या घरावर तोडक कारवाई करण्यासाठी ठाणे महानगरपालिका अधिकारी गेले असता दिनांक २४ फेब्रुवारी महाजनवाडी येथे पालघरचे पालकमंत्री महाराष्ट्राचे वन मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे संपर्क मंत्री गणेश नाईक यांची जनता दरबारात सदर इमारतीतील नागरिक व भारतीय जनता पार्टीच्या दिव्यातील कार्यकर्त्यांनी तातडीने भेट घेतली. त्यांच्याबरोबर कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, ठाण्याचे आमदार संजय केळकर, जिल्हा अध्यक्ष संजय वाघुळे उपस्थित होते.गणेश नाईक यांनी अधिकाऱ्यांना रहिवाशांची बाजु मांडण्यासाठी काही दिवसाचा अवधी मिळावा त्या अनुषंगाने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि अधिकाऱ्यांना सदर कारवाई स्थगित करण्याचे आदेश दिले.
विशेष म्हणजे कारवाई करायला जेव्हा पथक आले तेव्हा सर्वच पक्षाचे लोकप्रतिनिधी, सर्व समाजसेवी संस्था, दिवेकर ठामपणे या रहिवाश्यांच्या पाठीशी उभे राहिले.
यावेळी रहिवाश्यांनी गणेश नाईक आणि दिव्यातील सर्व भाजप पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. तसेच श्री.गणेश नाईक यांनी अनंत पार्क रहिवाश्यांना विश्वास दिला की या तुमच्या लढ्यात आम्ही पूर्णपणे तुमच्या सोबत आहोत. कोणताही अन्याय होऊ देणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ असेही नाईक यांनी सांगितल्याचे भाजपा अधिकारी म्हणाले.