Homeशहर परिसरदिव्यातील रस्त्यावरील अतिक्रमण हटवा,अन्यथा न्यायालयात जाणार

दिव्यातील रस्त्यावरील अतिक्रमण हटवा,अन्यथा न्यायालयात जाणार

शिवसेना ठाकरे गटाचे रोहिदास मुंडे यांचा इशारा

दिवा:- दिवा शहरातील रस्त्यावरील फेरीवाल्यांचे अतिक्रमण हटवून येथील नागरिकांना दिलासा द्या. शहरातील रस्ते फेरीवाला मुक्त न झाल्यास प्रशासनाच्या कारभाराविरोधात न्यायालयात जाण्याचा इशाराही मुंडे यांनी दिला आहे.

दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त यांना याबाबतचे पत्र रोहिदास मुंडे यांनी दिले आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, या फेरीवाल्यांना रस्त्यावर बसवणारे दिवा शहर बकाल करत आहेत. दिव्यात एकही रस्ता हा मोठा नाही.अशा स्थितीत आहेत ते रस्ते फेरीवाल्यांनी व्यापल्याने येथील 5 लाख जनतेने चालायचे कुठून आणि वाहन चालकांनी वाहने कुठून चालवायची. फेरीवाल्यांना ज्याने अभय दिले आहे त्यांचे आर्थिक हितसंबंध या लोकांशी आहेत.चार पैशांसाठी दिवाशहराची वाट लावण्याचे काम केले जात आहे.दिवा स्टेशन ते आगासन रस्ता,दिवा स्टेशन ते मुंब्रा देवी कॉलनी रस्ता, दिवा स्टेशन ते दिवा टर्निंग हे सर्वच रस्ते फेरीवाल्यांनी व्यापले आहेत.यामुळे वाहतूक कोंडी होत असून नागरिकांना चालण्यासाठी देखील जागा मिळत नाही असे मुंडे यांनी या पत्रात म्हटले आहे.याबाबत सहाय्यक आयुक्त यांनी तातडीने फेरीवाल्यांवर कारवाई करून दिवा स्टेशन रोड,मुंब्रा देवी कॉलनी, दिवा आगासन रोड फेरीवाला मुक्त करावा.फेरीवाल्यांना पालिकेने फेरीवाला झोन जाहीर करून त्या ठिकाणी फेरीवाले पालिकेचे बसवावेत जेणेकरून त्यांच्या रोजी रोटीचा प्रश्न निर्माण होणार नाह. नवी मुंबई ज्या पद्धतीने आतील रस्त्यांना किंवा गल्लीमध्ये फेरीवाला क्षेत्र असते किंवा एखाद्या मैदानात फेरीवाले असतात त्या पद्धतीने दिवा शहरात रचना करावी. मुख्य रस्त्यांवर असणारे फेरीवाले हटवून रस्ता नागरिकांसाठी मोकळा करावा अन्यथा या विरोधात नागरिकांच्या सहकार्याने न्यायालयात दाद मागणार असा इशारा दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी दिला आहे.

error: Content is protected !!