दिवा :- दिव्यात गेल्या काही काळापासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये झालेली वाढ आणि बिघडलेली कायदा-सुव्यवस्था या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. या संदर्भात जाब विचारण्यासाठी आणि तातडीने उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी मनसेचे दिवा शहराध्यक्ष तुषार पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी एका शिष्टमंडळाने स्थानिक पोलिसांची भेट घेतली. विशेष म्हणजे या वेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे स्थानिक नेतेही उपस्थित असल्याने, दिव्यातील सुरक्षेसाठी दोन्ही पक्ष एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले.
मंगळवारी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यावर धडक दिली. दिव्यात सध्या चोऱ्या, मारामारी आणि अवैध धंद्यांचे प्रमाण वाढले असल्याचे सांगत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले.
तुषार पाटील यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, शहरात गस्त वाढवण्यात यावी आणि गुन्हेगारांचा बंदोबस्त करावा. जर पोलिसांकडून ठोस कारवाई झाली नाही, तर मनसेला ‘मनसे स्टाईल’ने रस्त्यावर उतरावे लागेल, असा अप्रत्यक्ष इशाराही यावेळी देण्यात आला.
पोलिसांनी या शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेत शहरात गस्त वाढवण्याचे आणि गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे आश्वासन दिले आहे.






