दिवा:- नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून, दिवा शहरात आजपासून भव्य दिव्य रास गरबा सोहळ्याला सुरुवात होत आहे. राजे प्रतिष्ठानच्या वतीने, शिवसेनेचे विभागप्रमुख श्री. निलेश पाटील आणि सौ. अर्चना पाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले असून, साबे गाव येथील डी. जे. कॉम्प्लेक्स परिसरात हा उत्सव रंगणार आहे.हा दिव्यातील सर्वात मोठा रास गरबा उत्सव असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे.
राजे प्रतिष्ठानच्या माध्यमातून पाटील दांपत्य अनेक वर्षांपासून दिवा शहरात विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवत आहेत. त्यांची नवरात्रोत्सवात भव्य गरबा उत्सव आयोजित करण्याची परंपरा दिवेकरांमध्ये प्रसिद्ध आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही ही परंपरा कायम राहणार असून, यावेळचा गरबा महोत्सव हा दिव्यातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि भव्य दिव्य सोहळा ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
या आयोजनामागील मुख्य उद्देश शहरातील सर्व नागरिकांना एकत्र आणून त्यांना गरब्याचा मनसोक्त आनंद घेता यावा हा आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा वाढीस लागावा, अशी भावना श्री. निलेश पाटील यांनी व्यक्त केली. या भव्य सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून, दिव्यातील नागरिक मोठ्या उत्साहाने यात सहभागी होण्यासाठी सज्ज झाले आहेत.