दिवा: महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजून निवडणूक कार्यक्रम प्रत्यक्ष सुरू झाला असला, तरी दिवा परिसरात राजकीय संभ्रमावस्था कायम आहे. विशेषतः शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांमध्ये उमेदवारीबाबत अद्याप अनिश्चितता दिसून येत आहे. या दिरंगाईमुळे “बलाढ्य उमेदवारांसमोर नवखे उमेदवार तयारी कधी करणार?” असा सवाल कार्यकर्त्यांमधून उपस्थित केला जात आहे.
भाजपच्या प्रवेशामुळे ठाकरे गटाला खिंडार:
माजी आमदार सुभाष भोईर यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयाचे पडसाद दिव्यात मोठ्या प्रमाणावर उमटले आहेत. भोईर यांच्यासोबत युवा सेनेचे अनेक महत्त्वाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपमध्ये गेल्याने ठाकरे गटाची संघटनात्मक बांधणी विस्कळीत झाली आहे. या पडझडीनंतर आता पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना उभारी देणारा चेहरा शोधण्याचे मोठे आव्हान पक्षासमोर आहे.
प्रभाग २७, २८ आणि २९ मध्ये संभ्रम:
दिव्यातील महत्त्वाचे मानले जाणारे प्रभाग क्रमांक २७, २८ आणि २९ हे सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. या तिन्ही प्रभागांतून नेमकी कुणाला उमेदवारी मिळणार, याबाबत शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे या दोन्ही पक्षांकडून अद्याप कोणतेही स्पष्ट संकेत मिळालेले नाहीत. निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी आणि जनसंपर्क वाढवण्यासाठी अत्यंत कमी वेळ शिल्लक आहे. इतर पक्षांनी आपले तगडे उमेदवार मैदानात उतरवण्याची तयारी पूर्ण केली असताना, ठाकरे गट आणि मनसेच्या उमेदवार निवडीतील विलंबामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे.
नवख्या उमेदवारांसमोर वेळेचे आव्हान:
“जर या प्रभागांमध्ये ऐनवेळी नवख्या उमेदवारांना संधी दिली, तर त्यांना प्रस्थापित आणि साधनसामग्रीने सज्ज असलेल्या उमेदवारांचा सामना कसा करता येईल?” अशी चर्चा सध्या दिवा परिसरात रंगली आहे.
” मनसेकडे तिन्ही प्रभागांमध्ये सक्षम उमेदवार आहेत. त्यात ठाकरे गटाशी मनसेची बोलणी सुरू आहे. त्यांनी त्यांच्या इच्छुक उमेदवारांचे अर्ज तसेच आम्ही आमच्या इच्छुक उमेदवारांचे अर्ज वरिष्ठांकडे जमा केलेले आहेत. ज्या दिवशी युतीची औपचारिक घोषणा होईल त्या दिवशी कदाचित उमेदवार जाहीर केले जातील.”
– तुषार पाटील,शहर अध्यक्ष
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, दिवा






