दिवा:-पक्षफुटीनंतर दिवा शहरात संघटनात्मक बांधणी करण्यास ठाकरेंच्या शिवसेनेने सुरवात केली असून दिव्यात नवे शिलेदार नियुक्त केले आहेत.सचिन पाटील यांना शहरप्रमुख तर रोहिदास मुंडे यांना शहर संघटक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
पक्षफुटीच्या तब्बल एक वर्षानंतर दिवा शहराला सचिन पाटील यांच्या रूपाने तरुण शहरप्रमुख तर रोहिदास मुंडे यांच्यासारखा आक्रमण शहर संघटक मिळाल्याने ठाकरेंच्या शिवसैनिकात समाधान व्यक्त होत आहे.2017 ला दिवा हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून पुढे आला होता.सेनेचे आठ नगरसेवक दिव्यातून निवडून आले होते.पक्षफुटीनंतर यातील सात नगरसेवक शिंदेच्या शिवसेनेत गेले तर सचिन पाटील आणि अंकिता पाटील हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले. शिंदेंच्या शिवसेनेचे विरोधक असलेले तसेच भाजप मधून डावलण्यात आलेले माजी मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे यांना उद्धव ठाकरे यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश दिला होता. आता त्यांच्यावर दिवा शहर संघटक पदाची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.ठाकरेंच्या शिवसेनेने हळूहळू दिव्यात संघटनात्मक बांधणी करण्यास सुरुवात केली असून सचिन पाटील या तरुण शहर प्रमुखाची जबाबदारी अधिक वाढली आहे.