रस्त्याला समांतर सम-विषम पार्किंग कधी सुरू होणार?
■ सुहास खंडागळे/सडेतोड
दिवा शहर वाढले आहे.वाढत्या शहाराबरोबर वाहन संख्या देखील शहरात वाढली आहे. नागरिकांना वाहनांसाठी पार्किंग सुविधा उपलब्ध करून देणे पालिका व वाहतूक विभागाचे काम आहे.मात्र यादृष्टीने मागील काही वर्षात काम झालेले दिसत नाही.
ठाणे शहरात किंवा अन्य शहरात मुख्य रस्ता ,अंतर्गत रस्ते यांना काही ठिकाणी वाहने पार्क करण्यासाठी पालिका आणि वाहतूक विभाग जागा उपलब्ध करून देत असतो.रस्त्याला समांतर असे सम-विषम पध्दतीने हे पार्किंग उपलब्ध करून दिले जाते. यामुळे वाहने कुठेही पार्क न करता त्या ठिकाणी पार्क केली जातात.शहरांमध्ये पार्किंग ही गंभीर समस्या आहे.या समस्येवर तोडगा काढणे आवश्यक आहे.दिवा शहरातील इमारतींना पार्किंग नाही.पार्किंग साठी मैदाने उपलब्ध नाहीत.पे अँड पार्क साठी पार्किंग प्लाझा नाही अशा स्थितीत उपलब्ध असणाऱ्या मुख्य व अंतर्गत रस्त्याच्या दुतर्फा समांतर पार्किंग उपलब्ध करून देणे पालिका व वाहतूक पोलिसांचे काम आहे.त्यादृष्टीने उपाययोजना आतापासून व्हायला हव्यात.
रिक्षा थांब्याचे नियोजन व्हायला हवे. एखादे शहर उभे राहत असताना त्याकडे लक्ष दिले गेले नाही तर ते शहर भविष्यात बकाल होऊ शकते.दिवा शहरात मुंब्रादेवी कॉलनी रोड,दिवा आगासन रोड,साबे गाव रोड याच बरोबर अंतर्गत रस्त्यांना समांतर पार्किंग साठी पालिका प्रशासन आणि वाहतूक पोलिसांनी आतापासून नियोजन करायला हवे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी याचे गांभीर्य ओळखायला हवे. तुम्ही प्रशासन म्हणून नागरिकांना पार्किंगच उपलब्ध करून देणार नसाल तर वाहनचालक त्यांची वाहने जिथे जागा मिळेल तिथे पार्क करणार. हे टाळण्यासाठी ज्यांच्यावर नियोजनाची जबाबदारी आहे त्यांनी त्यांच्या जबाबदारी पार पाडायला हव्यात. दिवा शहरात आतापासूनच पार्किंग बाबत ठोस भूमिका प्रशासनाने घ्यायला हवी. पार्किंग बाबत आताच ठोस भूमिका न घेतल्यास भविष्यात शहराला मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागेल.