Homeठाणे-मेट्रोदिव्यात शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे युतीत बिघाडी; दोन्ही पक्षात मैत्रीपूर्ण लढतीची...

दिव्यात शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे युतीत बिघाडी; दोन्ही पक्षात मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता

दिवा:ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्यात युतीचे चित्र असताना, दिवा शहरात मात्र या युतीला मोठे तडे गेल्याचे पाहायला मिळत आहे. जागावाटपाचा घोळ आणि समन्वयाचा अभाव यामुळे दिव्यात दोन्ही पक्षांमधील ‘बिघाडी’ चव्हाट्यावर आली असून, तीन जागांवर दोन्ही पक्षांचे उमेदवार एकमेकांसमोर उभे आहेत. अर्ज मागे घ्यायच्या शेवटच्या दिवशीही दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज मागे न घेतल्याने या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता आहे.

प्रभागांमधील विसंगत चित्र:
जागावाटपाच्या नियोजनात दोन्ही पक्षांना पूर्ण पॅनल उभे करण्यात अपयश आल्याचे दिसून येत आहे:
प्रभाग क्रमांक २८: येथे शिवसेना ठाकरे गटाकडे ३ उमेदवार तर मनसेकडे २ उमेदवार आहेत. ठाकरे गटाने येथे स्वतंत्र पॅनल म्हणून लढण्याचा निर्णय घेतला आहे. एक जागा ठाकरे गटाची रिक्त राहिली आहे तर मनसेच्या दोन जागा रिक्त राहिल्या आहेत.
प्रभाग क्रमांक २७: या प्रभागात मनसेचे ४ उमेदवार असून त्यांचे पूर्ण पॅनल तयार आहे. मात्र, येथे ठाकरे गटाकडे केवळ २ उमेदवार असल्याने त्यांच्या २ जागा रिक्त राहिल्याचे स्पष्ट झाले आहे.

तीन ठिकाणी ‘फ्रेंडली फाईट’?
मिळालेल्या माहितीनुसार, दिवा शहरात मनसेने एकूण ८ जागांपैकी ६ ठिकाणी उमेदवार दिले आहेत, तर ठाकरे गटाने ८ पैकी केवळ ५ ठिकाणी उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. विशेष म्हणजे, तीन महत्त्वाच्या जागांवर दोन्ही पक्षांचे उमेदवार आमनेसामने आल्याने दिव्यात युती कागदावरच उरल्याची चर्चा आहे.

ठाणे शहरात एकत्र लढण्याचे संकेत असताना दिव्यात मात्र एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकल्याने मतदारांमध्येही संभ्रमाचे वातावरण आहे. या विसंवादाचा फायदा कोणाला होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!