ठाणे:- दिवा खर्डीगावातील फडके पाडा तलावा जवळील चौधरी कंपाऊंड मधील खुल्या मैदानात असलेल्या लाकडाच्या वखारीसह प्लास्टिक साहित्य आणि इतर ५ भंगाराच्या गोडाऊनला मंगळवारी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास आग लागली. ही तब्बल तीन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना त्या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नसली तर ते सातही गोडाऊन जळून खाक झाले आहेत. अशी माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.
दिवा खर्डीगाव येथे आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी दिवा पोलीस कर्मचारी, टोरंट पॉवरचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली. तसेच लाकडाची वखार आणि प्लास्टिक साहित्य असल्याने आगीने काही क्षणात रुद्र रूप धारण केले होते. तसेच धुराचे लोट हे लांबवरून दिसत होते. याचदरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे
प्रयत्न सुरू केले. एक – एक करता, मोकळ्या मैदानातील ते सात ही गोडाऊनला आगीने काही क्षणात जखडून घेतले. यावेळी ०३-हायराईज फायर वाहनासह ०२-वॉटर टँकर आणि ०१-रेस्क्यू वाहनाच्या मदतीने त्या आगीवर रात्री सव्वा एक वाजण्याच्या सुमारास म्हणजे तब्बल तीन तासांच्या प्रयत्नानंतर नियंत्रण मिळविण्यात यश आले. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांना स्थानिक राहिवासींची साथ लाभली. या आगीत त्या सर्व गोडाऊन मधील साहित्य पूर्णपणे जळून नुकसान झाले आहे. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.