ठाणे: तुळशीधाम, धर्मवीर नगर परिसरातील सिद्धिविनायक या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील रूम नंबर ६०३ मधील देव्हाऱ्याला अचानक आग लागली. या घटनेत घरातील देव्हाऱ्यासह टीव्ही, कपाट व इलेक्ट्रिक वायरिंग जळुन खाक झाली असून आग लागली त्यावेळी घरात कोणी नव्हते. ही घटना शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास समोर आली.
ज्या घरात आग लागली ते घर दिलीप शिंदे नामक व्यक्तीच्या मालकीचे असून त्या घरात नेकपाल करोतीया हे भाड्याने राहत आहेत. शनिवारी दुपारी काही कामानिमित्त घरातील मंडळी घर बंद करून बाहेर गेले होते. याचदरम्यान घरातील देव्हाऱ्याला आग लागली. या घटनेची माहिती गोविंद चव्हाण नामक इसमाने ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षेला दिल्यावर आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल या विभागांनी धाव घेतली. त्या लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र त्या आगीत घरातील देव्हाऱ्यासह टीव्ही,कपाट आणि इलेक्ट्रिक वायरिंग जळुन खाक झाले आहे. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.






