सिव्हील रुग्णालयात फिटनेस प्रमाण पात्रासाठी येणाऱ्या १० व्यक्ती पैकी २ ते ३ व्यक्तींना बहिरे पणाची सुरुवातीची लक्षणे आढळतात.
ठाणे : – ध्वनी प्रदूषणाचा वाढता प्रादुर्भाव तरुण पिढीसाठी धोक्याची घंटा असून, कानामध्ये इयर फोन घालून मोठ्या आवाजात गाणी ऐकणे ही फॅशन झाली आहे. मात्र ही फॅशन कानावर आघात करून, बहिरेपणा वाढवणारी आहे. त्यामुळे कर्कश आवाजावर कुठे तरी स्वतःहून निर्बंध घालण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी केले.
राष्ट्रीय कर्णबधिरता प्रतिबंध आणि नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जागतिक श्रवण दिवस ठाणे सिव्हील रुग्णालयात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार,अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धीरज महांगडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मृणाल राहुड, डॉ. विश्वास वासनिक, विनोद जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मागदर्शनपर बोलताना डॉ. कैलास पवार म्हणाले की, मोठ्या आवाजामुळे कायमचे बहिरेपणा तर येतोच पण हृदय विकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रेल्वे अथवा रस्ते अपघातात एखादा पादचारी मृत्युमुखी पडतो. परंतु झालेल्या अपघातात काही वेळा कानात इयर फोन घालून स्वतःच्या तंद्रीत चालताना पादचारी मृत्यूच्या दाढेत ओढला गेल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत.
७० ते ९० च्या दशकात सिनेमा गृहात गाणी ऐकताना एक वेगळा आनंद मिळत होता. मात्र आताची गाणी भयंकर वाटतात. डीजे सारख्या आवाजात गाणी ऐकून कानबधीर होतात. ठाणे सिव्हील रुग्णालयात फिटनेस प्रमाणपत्र घेण्यासाठी येणाऱ्या १० व्यक्तींपैकी २ ते ३ व्यक्तींना बहिरेपणा येण्याची सुरुवातीची लक्षणे आढळतात.