ठाणे जिल्हा प्रशासनाने केली तीन वर्षासाठी नियुक्ती.
ठाणे: – नागरी संरक्षण दलाच्या चीफ वॉर्डनपदी ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पदाचा कार्यकाल तीन वर्ष कालावधीचा आहे. कल्याण येथे नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात तत्कालीन जिल्हादंडाधिकारी व नागरी संरक्षण दलाचे ठाणे विभाग नियंत्रक अशोक शिनगारे आणि उपनियंत्रक विजय जाधव यांच्या उपस्थितीत आ. केळकर यांनी नियुक्तीपत्र स्विकारले. राजकारणाला समाजकारणाची जोड देऊन समाजसेवेत अविरत कार्यरत असलेल्या आ.संजय केळकर यांच्या कार्याची ही पोचपावती असल्याने त्यांच्या नियुक्तीबद्दल सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे.
आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी आणि मदत करण्यासाठी नागरी संरक्षण दल स्थापन करण्यात आले आहे. नैसर्गिक आपत्ती, मानवनिर्मित आपत्ती किंवा इतर कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना मदत करण्याबरोबरच नागरी संरक्षण दल हे राज्याच्या तसेच देशाच्या संरक्षणात एक महत्त्वाची भूमिका बजावत आली आहे. ठाणे जिल्हयातील हजारो स्वयंसेवक नागरी संरक्षण दलात कार्यरत असुन पोलीस तसेच प्रशासनाच्या मदतीला धावुन जातात. यापूर्वी आ. संजय केळकर २००३ पासुन नागरी संरक्षण दलाचे सल्लागार म्हणुन तर २०१३ ते २०१६ तीन वर्षे चीफ वार्डन पदी नियुक्त होते. या कामात आपल्या कार्याचा ठसा उमटविल्याने पुन्हा एकदा आ. संजय केळकर यांची नागरी संरक्षण दलाच्या चीफ वॉर्डनपदी तीन वर्ष कालावधी करिता नियुक्ती करण्यात आली आहे.