Homeठाणे-मेट्रोनिवासी मालमत्ता करावरील शास्ती / व्याजामध्ये 90 टक्के सूट योजनेस 31 मार्चपर्यंत...

निवासी मालमत्ता करावरील शास्ती / व्याजामध्ये 90 टक्के सूट योजनेस 31 मार्चपर्यंत मुदतवाढ ; अन‍िवासी मालमतांनाही सवलत लागू

योजनेचा लाभ घेण्याचे महापौर शर्मिला पिंपळोलकर व आयुक्त सौरभ राव यांचे नागरिकांना आवाहन

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील करदात्यांसाठी निवासी मालमत्ता करावरील शास्ती (दंड/व्याज) मध्ये 90 टक्के सूट देण्याच्या योजनेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून असून या योजनेस 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ देत असतानाच अनिवासी मालमत्ताधारकांनाही सूट देण्याचा निर्णय महापौर शर्मिला पिंपळोलकर व आयुक्त सौरभ राव यांनी घेतला आहे. तरी निवासी / अन‍िवासी मालमत्ताधारकांसाठीही या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

आज झालेल्या विशेष अर्थसंकल्पीय सभेत सभागृह नेते हणमंत जगदाळे यांनी मालमत्ता कर भरणेस मुदतवाढ देण्याची सूचना मांडली, याला विरोधी पक्षनेते अशरफ ऊ. शानू पठाण व शिवसेना गटनेते पवन कदम यांनी अनुमोदन दिले. त्यास महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी मान्यता दिली.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील जे निवासी करदाते थकीत मालमत्ता कर, चालू वर्षाचा कर त्यांना आकारण्यात आलेल्या शास्तीच्या 10 टक्के अशी एकत्रित रक्कम महापालिकेकडे जमा करण्याची मुदत 25 मार्च 2026 पर्यंत ठेवण्यात आली होती, या योजनेस करदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता या योजनेस 31 मार्चपर्यंत मुदतवाढ निर्णय महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी घेतला असून करदात्यांचे आभार व्यक्त केले आहेत. तसेच अनिवासी मालमत्ताधारकांनाही ही योजना लागू केली आहे.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील जे निवासी / अन‍िवासी करदाते थकीत मालमत्ता कर, चालू वर्षाचा कर त्यांना आकारण्यात आलेल्या शास्तीच्या 10 टक्के अशी एकत्रित रक्कम महापालिकेकडे जमा करतील अशा निवासी / अनिवासी करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावर कराधान नियम 41 (1) अन्वये आकारण्यात आलेल्या शास्तीमध्ये 90 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या करदात्यांनी या निर्णयापूर्वी त्यांचा निवासी / अनविासी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केला असेल, अशा करदात्यांना सदरची योजना लागू असणार आहे. या योजनेचा उद्देश नागरिकांना थकीत निवासी / अनिवासी मालमत्ता कर भरण्यास प्रोत्साहन देणे हा असल्याचे नमूद करीत महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी ही अंतिम संधी असल्याचे म्हटले आहे.

महापालिकेच्या प्रभाग समिती स्तरावरील सर्व संकलन केंद्रांवर कार्यालयीन दिवशी सकाळी 10.30 ते सायंकाळी 5.00 या वेळेत तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी तसेच शनिवार-रविवारी सकाळी 10.30 ते दुपारी 4.00 या वेळेत कर भरता येणार आहे. तसेच महापालिकेच्या www.thanecity.gov.in⁠ या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने कर भरण्याची सुविधा उपलब्ध असून Google Pay, PhonePe, Paytm आणि BHIM अॅपद्वारेही सुलभतेने कर जमा करु शकतील. करदात्यांना कराचे देयक पाहणे व कर भरणे सुलभ व्हावे यासाकरिता +912225331590 या WhatsApp, Chatbot ही प्रणाली ठाणे महापालिकेने कार्यान्व‍ित केली असून, करदाते याद्वारे देखील सुलभतेने कर जमा करु शकतील.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील करदात्यांनी या संधीचा लाभ घेऊन थकीत मालमत्ता कर भरावा, असे आवाहन महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!