दिवा:- भर रस्त्यात एका पालकाला मारहाण करणाऱ्या आर एल पी शाळेच्या कर्मचाऱ्यांना जाब विचारण्यासाठी मनसेने थेट शाळेत धडक दिली.
शहरातील मुंब्रादेवी कॉलनी येथील आर.एल.पी शाळेतील कर्मचाऱ्यांकडून पालकाला मारहाण करीत असल्याचा व्हिडीओ सोशल माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर मनसे दिवा शहर अध्यक्ष तुषार भास्कर पाटील यांच्या सूचनेनुसार मनविसे विभाग अध्यक्ष कुशाल पाटील यांनी तात्काळ आपल्या सहकाऱ्यांसोबत संबंधित शाळेवर धडक दिली.झाल्या प्रकारा बद्दल शाळेतील कर्मचाऱ्यांना मनसे स्टाईल जाब विचारल्यानंतर शाळा कर्मचाऱ्यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली. यावेळी मारहाण झालेले पालक उपस्थित नसल्याने त्यांची बाजू समजून घेऊन शाळेवर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे कुशाल पाटील यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या सोबत मनविसेचे उपविभाग अध्यक्ष गौरव कदम,शाखाध्यक्ष ज्ञानेश्वर आगवणे, परेश म्हात्रे आणि उपशाखाध्यक्ष निखिल पाटील हे पदाधिकारी उपस्थित होते.






