ठाणे :- मान्सूनच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात विविध प्राधिकरणामार्फत तसेच ठाणे महापालिकेच्यावतीने सुरू असलेली सर्व विकासकामे ही येत्या 20 मे पर्यंत पूर्ण करावीत. घोडबंदर रोडवर सुरू असलेल्या कामांवर महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवून सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण होतील या दृष्टीने संबंधित प्राधिकरणांशी समन्वय साधावा. पावसाळयात कोणतीही आपत्ती उद्भवल्यास एकमेकांवर केलेले आरोप खपवून घेतले जाणार नाहीत, तसेच पावसाळा कालावधीत सर्व यंत्रणांनी सतर्क रहावेअशा सूचना महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी आज झालेल्या बैठकीत सर्व प्राधिकरणांना दिल्या आहेत.
मान्सूनपूर्व कामांचा आढावा तसेच मान्सून कालावधीत करावयाच्या उपाययोजना याचा आढावा घेण्यासाठी आज महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी आज बैठक आयोजित केली होती. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट, यांच्यासह महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीएचे अधिकारी, मेट्रो, महावितरण, महानगर गॅस, रेल्वे आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मान्सून कालावधीत सर्व यंत्रणांनी अलर्ट मोडवर रहावे. भरतीच्या वेळांवर लक्ष ठेवून ज्या दिवशी जास्त उंचीच्या लाटा असतील त्या दिवशी आवश्यक त्या उपाययोजनांसह यंत्रणांनी सज्ज रहावे. तसेच सर्व विभागांचेआपत्ती व्यवस्थान कक्ष 24×7 कार्यान्वित ठेवण्याच्या सूचनाही आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या.
एमएमआरडीएने मान्सूनपूर्वी सर्व रस्त्यांची आवश्यक देखभाल व दुरूस्ती करुन घ्यावी, रस्त्यावर खड्डे पडून अपघात होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच ज्या ठिकाणची रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत तेथील बॅरिगेटस काढून घ्यावेत. तसेच तत्वज्ञान विद्यापीठ येथे सुरू असलेल्या रस्त्याची कामे 20 मे पूर्वी पूर्ण करावीत. मेट्रोच्या कामासाठी उभारण्यात आलेले लोखंडी बॅरीगेटस जमिनीपासून वर उचलावेत तसेच ज्या ठिकाणची कामे पूर्ण झाली आहेत, त्या ठिकाणी पडलेले अनावश्यक साहित्य उचलण्याच्या सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या.
महापालिका कार्यक्षेत्रात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मान्सूनपूर्वी रस्ते व पुलाची देखभाल दुरूस्ती करुन घ्यावी, अतिवृष्टीने खड्डे पडल्यास अत्याधुनिक यंत्रणा वापरुन ते तात्काळ दुरूस्त होतील या दृष्टीने आवश्यक ती साधनसामुग्री सज्ज ठेवावी. कळवा ते माजिवडापर्यंतचा रस्ता मे अखेरपर्यत पूर्ण करावा. खारीगांव टोलनाका येथील रस्त्यावर मास्टीकचे काम निविदा काढून पूर्ण करुन घेण्याचे निर्देशही या बैठकीत देण्यात आले.
रेल्वेच्या हद्दीत असलेले अंतर्गत नाले कलव्हर्टची साफसफाई करुन घ्यावी. तसेच रेल्वेचे कलव्हर्ट नियमित स्वच्छ होतील या दृष्टीने कायमस्वरुपी उपाययोजना कराव्यात. रेल्वेच्या हद्दीत करावयाच्या कामांबाबत महापालिका व रेल्वेच्या अभियंत्यांनी एकत्रित पाहणी करुन आवश्यक ती सर्व कामे तातडीने पूर्ण करुन घ्यावीत.
पावसाळ्यात वाहतूक कोंडी होणार नाही या दृष्टीने वाहतूक विभागाने नियोजन करावेत, यासाठी समन्वय अधिकारी नेमावेत. ज्युपिटर रुग्णालय येथे सुरू असलेली रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करावीत असे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी नमूद केले. तसेच रोड नं. 22 रस्ता येथे कलव्हर्टचे काम अपूर्ण असून या कामासाठी अतिरिक्त मनुष्यबळ पुरवून सदरचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्त सौरभ राव यांनी नगरअभियंत्यांना दिल्या. हे काम 5 जूनपूर्वी पुर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. चिरागनगर कॅडबरी जंक्शन येथे सुरू असलेली कामे देखील युध्दपातळीवर पूर्ण करावीत.
ठाणे शहरात विविध ठिकाणी बेवारस असलेली वाहने उचलण्याची कार्यवाही प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने करण्यात यावी यासाठी कॅम्प लावून लिलावाची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी यावेळी दिल्या. महापालिका क्षेत्रात नालेसफाईची कामे सुरू असून या ठिकाणी एमएसईबीच्या केबल्स गेल्यामुळे नालेसफाई करताना अनेक अडचणी येत असून यासाठी ज्या विभागाच्या केबल्स आहे त्यांनी यावर तातडीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.
महापालिका कार्यक्षेत्रातील धोकादायक झाडे व झाडांच्या फांद्या छाटणीचे काम सुरू असून सदरचे काम 30 मे पर्यत पूर्ण करुन यापासून निर्माण होणारा हरित कचऱ्याची तातडीने विल्हेवाट लावण्याच्या सूचना देत मान्सून कालावधील सर्व यंत्रणांनी आपापसात समन्वय ठेवण्याचे निर्देशही आयुक्त सौरभ राव यांनी दिले.