Homeठाणे-मेट्रोप्रभाग 29 -साबे परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी नगरसेविका अर्चना निलेश पाटील यांनी महासभेत...

प्रभाग 29 -साबे परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी नगरसेविका अर्चना निलेश पाटील यांनी महासभेत मांडल्या महत्त्वपूर्ण मागण्या

ठाणे:ठाणे महानगरपालिकेच्या २०२६-२०२७ च्या अर्थसंकल्पीय महासभेत शिवसेना नगरसेविका अर्चना निलेश पाटील यांनी आपल्या प्रभाग क्रमांक २९ मधील प्रलंबित समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. साबे गाव आणि परिसरातील नागरिकांचे जीवन सुसह्य व्हावे, यासाठी त्यांनी रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि मूलभूत सुविधांबाबत आग्रही मागण्या केल्या.
पायाभूत सुविधा आणि वाहतूक कोंडीवर भर
साबे गावासाठी स्टेशनपासून एकमेव रस्ता असल्याने होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता, त्यांनी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तसेच, २०१८ पासून रखडलेल्या दिवा स्टेशन येथील ब्रिजचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना मोबदला देऊन जागा हस्तांतरित करण्याची प्रक्रिया जलद करावी, असे त्यांनी सुचवले.
शिक्षण आणि आरोग्य व्यवस्थेत सुधारणा:
भावी पिढीच्या शिक्षणासाठी त्यांनी टीएमसी शाळा क्रमांक ८० चे श्रेणीवर्धन करून ती माध्यमिक शाळा (इयत्ता १० वी पर्यंत) करण्याची आणि तिथे सेमी-इंग्रजी माध्यम सुरू करण्याची मागणी केली. आरोग्य सुविधेबाबत बोलताना त्यांनी पालिकेच्या मान्यताप्राप्त डॉक्टरांकडून होणाऱ्या लुटीवर अंकुश ठेवण्याची आणि आरोग्य सेवांचा विस्तार करण्याची विनंती केली.
स्वच्छता आणि सामाजिक सुरक्षा:
प्रभागातील वाढती नशेखोरी रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आणि कडक पोलीस कारवाई करण्याची मागणी पाटील यांनी केली. तसेच, साफसफाई, गटारे उपसा आणि सुलभ शौचालयांच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधून नागरिकांना स्वच्छ पर्यावरण देण्याची भूमिका त्यांनी मांडली.
नागरिकांसाठी विशेष सुविधा:
वृद्ध नागरिकांसाठी जेष्ठ नागरिक कट्टा, छोटे गार्डन आणि तरुणांसाठी मोठे मैदान विकसित करण्यावर त्यांनी भर दिला. धार्मिक आणि सामाजिक भावनेचा विचार करून साबे विभागात गणेशघाट व दशक्रिया विधी स्थळ बांधून मिळावे अशी मागणी त्यांनी केली.
नगरसेविका अर्चना निलेश पाटील यांच्या या सकारात्मक आणि जनहितार्थ मांडलेल्या मुद्द्यांमुळे प्रभाग २९ -साबे परिसरातील विकासाला नवी गती मिळण्याची आशा नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

error: Content is protected !!